‘ज्या दिवशी जरांगे मुंबईत उपोषणाला बसतील त्याच दिवशी…’, लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा

Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसचे आगामी निवडणुकीत ओबीसीतील कुणब्यांचे बोगस दाखले घेऊन काही आरक्षण चोरमंडळी निवडणुकीला उभे राहिले तर त्यांना खड्यासारखे बाजूला काढा आणि जो खरा ओबीसी आहे त्याला निवडून द्या असं आवानही यावेळी लक्ष्मण हाके यांनी केलं.
ज्या दिवशी मनोज जरांगे नावाचा माणूस मुंबई येथे उपोषणाला बसेल, त्याच दिवशी आम्ही नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथे खंडोबाला ओबीसीच्या वतीने नारळ फोडून माळेगाव ते मुंबई लाँग मार्च काढणार आहोत, या माध्यमातून आम्ही गावगाड्यातील ओबीसी समुहाला एकत्र आणणार आहोत. आपले ओबीसीचे न्याय हक्क टिकले पाहिजे यासाठी जनजागृती करणार त्यासाठी राज्यभर सभा घेणार, असं हाके यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना हाके यांनी पवार कुटुंबावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. जे पवार कुटुंब मनोज जरांगे यांना आंदोलन करायला लावतं, सगळी रसद पुरवतं, त्याच पवरांचे जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कौतुक करणार असतील तर आम्हाला चालणार नाही, लढायला आम्ही आणि जेवायला पवार हे कदापीही चालणार नाही, असा इशारा यावेळी हाके यांनी दिला आहे. पवार, देशमुख यांच्यासारख्या मोठ्या कारखानदार लोकांनी ओबीसीवर अन्याय केला, म्हणून आम्ही भाजपाला स्वीकारले आहे. इथून पुढच्या काळात राज्याचा मुख्यमंत्री देखील ओबीसीच ठरवेल, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
हेही वाचा – त्या’ हॉटेलचा न्यायालयाच्या आदेशाने लिलाव; मंत्री संजय शिरसाटांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर
यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे गोचिडासारखं अर्थ खात्याला चिटकून बसले आहेत. अजितदादा पवार हे सामाजिक असंवेदनशील माणूस आहेत, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असा हा माणूस आहे. अजित पवार हे आम्हाला कधीच जवळचे वाटले नाहीत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही तुमच्याकडे बघून मतदान केले आहे, तुम्हांला मुख्यमंत्री केले आहे आम्हला वाऱ्यावर सोडू नका, असं हाके यांनी म्हटलं.
धनगर समाजाचा निधी अजित पवार यांनी अडवला म्हणून तक्रार करणार आहे, जर मुख्यमंत्री यांनी तक्रार ऐकूण घेतली नाही तर राज्याचा मुख्यमंत्री आता ओबीसी ठरवणार आहे, हे लक्षात ठेवावे, जरांगे यांना लोकशाही कळत नाही, जरांगे हे लोकशाहीचा अनादर करणारे आहेत. ते ओबीसीचा आणि छगन भुजबळ यांचा तिरस्कार करतात, असा हल्लाबोलही यावेळी हाके यांनी केला आहे.