त्या’ हॉटेलचा न्यायालयाच्या आदेशाने लिलाव; मंत्री संजय शिरसाटांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

छत्रपती संभाजीनगर : खासदार संजय राऊतांनी मंत्री संजय शिरसाटांसह त्यांच्या मुलावर ‘व्हिट्स’ नामक हॉटेल खरेदीमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. तब्बल 67 कोटींचे हॉटेल खरेदी केल्याचा आरोप राऊतांनी केला. यावर संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘राऊत मूर्ख माणूस आहे. त्या हॉटेलचा न्यायालयाच्या आदेशाने लिलाव झाला आहे.’ असे शिरसाट म्हणाले. तसेच शिरसाटांनी घराणेशाहीवरुनही राऊतांवर निशाणा साधला.
संजय शिरसाट म्हणाले की, ‘व्हिट्स’ हॉटेल माझ्या मुलाने विकत घेतले, असे सांगितले गेले. मात्र त्यामध्ये माझा मुलगा एकटा नसून त्यात पाच पार्टनर आहेत. संजय राऊत मूर्ख माणूस आहे. ‘व्हिट्स’ हॉटेलचा लिलाव सात वेळा झाला आहे. त्या हॉटेलचा न्यायालयाच्या आदेशाने लिलाव झाला आहे. न्यायालयाने त्याची किंमत ठरवलेली आहे. लिलाव थांबण्यासाठी एकजण कोर्टात गेला होता. मात्र न्यायालयाने ते मान्य केलेले नाही.
हेही वाचा – वारकऱ्यांना टोलमाफी, विम्याचा लाभ, नोडल अधिकारीही नेमणार; आषाढीनिमित्त एकनाथ शिंदेंची घोषणा
शिरसाटांनी असेही नमूद केले की, हॉटेलसाठी ५० टक्के लोन बँक देणार आहे. तर उर्वरित ५० टक्के रक्कम सर्व पाच पार्टनर मिळून भरणार आहेच. आमच्या मुलांनी व्यवसाय करायचा नाही का? आमची मुलं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाहीत. अगोदर विषय समजून घ्या, त्यानंतर बोला. अशा शब्दांत शिरसाटांनी राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
राऊतांना प्रतिप्रश्न करत शिरसाट पुढे म्हणाले, कोणत्या गोष्टीवर भ्रष्टाचार केला ते सांगा. जर काही चुकीच झाले असेल तर मी समोर येऊन बोलेन. राऊतांची रात्रीची दारू उतरली नसल्याने सकाळी बडबड करतात. हे पर्सेनटेजवाले दलाल आहेत. या हॉटेलचा लिलाव काही माझ्यासाठी झाला नाही. ही सातवी वेळ आहे, लिलावाची. एखाद्या मराठी माणसाने उद्योग उघडू नये का? दलालांनो मेहनत करा आणि मोठे व्हा, असा खोचक टोला शिरसाटांनी राऊतांना उद्देशून लगावला आहे.