‘कोयनानगर, कास, पाचगणी, महाबळेश्वर या पर्यटनस्थळांवर विशेष सुरक्षा दल तैनात करणार’; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

कोयनानगर : साताऱ्याच्या पर्यटन नकाशावर महत्त्वाचे स्थान असलेल्या कोयनानगर, कास पठार, पाचगणी व महाबळेश्वर या पर्यटनस्थळांवर आता पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष सुरक्षा दल तैनात करण्यात येणार आहे. राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या पुढाकाराने या भागात सुरक्षेच्या दृष्टीने ऐतिहासिक पावले उचलली जात आहेत.
अलिकडच्या काळात वाढलेल्या पर्यटकांच्या संख्येमुळे आणि त्यातून उदभवणाऱ्या असुरक्षिततेच्या घटनांमुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. याची दखल घेत गृहराज्यमंत्री देसाई यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस दल आणि पर्यटन विभाग यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर आता कोयनानगरपासून महाबळेश्वरपर्यंतच्या पर्यटन पट्ट्यांमध्ये सुरक्षा यंत्रणा बळकट करण्याचा निर्णय झाला आहे.
हेही वाचा – राज्यातील 6 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट; मुंबई पुण्यात काय स्थिती?
सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे :
-कोयनानगर धरण परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढत असलेल्या या भागात वन विभाग व पोलीस यांचं संयुक्त गस्त पथक कार्यरत होणार.
-कास पठारावर प्रवेश तपासणी होणार, अनधिकृत वाहनांची व गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तपासणी नाके उभारले जाणार.
-पाचगणी आणि महाबळेश्वरमध्ये मोबाइल पथक होतील. बाजारपेठ, पॉईंट्स व हॉटेल भागात मोबाइल सुरक्षा पथक कार्यरत होईल.
-सीसीटीव्ही, ड्रोन आणि मदत केंद्रांची आखणी करुन पर्यटनस्थळांवर सीसीटीव्ही निगराणी, ड्रोन उड्डाण निरीक्षण, तसेच पर्यटक सहाय्यता केंद्रं कार्यान्वित केली जाणार आहेत.
-महिलांसाठी स्वतंत्र मदत कक्ष, हरवलेले पर्यटक शोधण्यासाठी तात्काळ प्रतिसाद यंत्रणा, आणि स्थानिक स्वयंसेवकांशी समन्वय या गोष्टींवर भर दिला जाणार आहे.
-या सुरक्षेच्या उपक्रमाचा कोयनानगर परिसरातील देवणेवाडी, बामणोली, टपोल या भागांनाही लाभ होणार असून, स्थानिक पर्यटन व्यवसायालाही चालना मिळणार आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
साताऱ्याचे पर्यटन केवळ निसर्गरम्य नाही, तर आता सुरक्षितही असावे, यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. कोयनानगरसह संपूर्ण पर्यटन पट्टा सुरक्षिततेच्या बाबतीत इतर जिल्ह्यांसाठी आदर्श ठरेल.
– शंभूराज देसाई (पर्यटन मंत्री, महाराष्ट्र)