जूनचा पंधरवडा संपला तरी मान्सून खोळंबला! आज ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’

पुणे | जून महिन्याचा पंधरवडा उलटून गेला तरी राज्यात अद्याप मान्सून पूर्णपणे सक्रिय झालेला नाही. यामुळे राज्यभरात नागरिकांना तीव्र उष्णता आणि दमट हवामानाचा सामना करावा लागत असून, चातकासारखी पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या मान्सून की वाटचाल संथ गतीने सुरू असली, तरी आज (१८ जून) राज्यातील काही भागांत वादळी पावसाची शक्यता वर्तवत हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
हवामान अंदाज आणि पावसाचा यलो अलर्ट
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील रत्नागिरी, रायगड, पुणे शहर आणि पुणे घाट विभागासह विदर्भ-मराठवाड्यातील नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज असून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर दुसरीकडे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक घाट विभाग, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, परभणी आणि हिंगोली या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या कार्याचा गौरव
विदर्भात उष्णतेची लाट, कोकणात दमट हवामान
सामान्यतः ५ जूनच्या आसपास मान्सून तळकोकणात दाखल होतो आणि १५ ते २० जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापतो. मात्र, यंदा आवश्यक हवेचा जोर आणि हवेतील आर्द्रतेची कमतरता असल्यामुळे ८ जूनपासून मान्सून एकाच जागी स्थिर आहे. पुढील दोन दिवसांत राज्यातील अंतर्गत भागांत कमाल तापमानात आणखी १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होईल, असा अंदाज आहे. सध्या कोकण आणि मराठवाड्यात दमट वातावरणामुळे नागरिक घामाघूम झाले आहेत, तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थितीची नोंद होत आहे.





