ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘आयर्नमॅन’ विजेत्या थेरगावच्या कपूर दांपत्याचा स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते गौरव

क्रीडा विश्व: एशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत फडकवला तिरंगा

पिंपरी- चिंचवड | जगातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘आयर्नमॅन’ (Ironman) या जागतिक क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक यश संपादन करून पिंपरी-चिंचवड शहराची मान जागतिक स्तरावर उंचावणाऱ्या थेरगाव येथील रहिवासी दिनेश कपूर आणि योगिता कपूर या दांपत्याचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात विशेष गौरव करण्यात आला. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन या दांपत्याचा सत्कार करण्यात आला.

जर्मनीच्या भूमीवर फडकवला भारताचा तिरंगा

जर्मनीतील हॅम्बर्ग येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘युरोपियन चॅम्पियनशिप’मध्ये कपूर दांपत्याने आपली जिद्द आणि चिकाटी सिद्ध केली. या स्पर्धेमध्ये ३.८ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२.२ किलोमीटर मॅरेथॉन धावणे हे तीन अत्यंत खडतर टप्पे एकाच दिवसात पूर्ण करावे लागतात. दिनेश कपूर आणि योगिता कपूर यांनी हे आव्हान लीलया पेलत अवघ्या १४ तास १३ मिनिटे २८ सेकंदांत ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली आणि फिनिश लाईनवर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला.

हेही वाचा

पाणी बचतीसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

या गौरव सोहळ्याला महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे आणि नगरसचिव मुकेश कोळप यांच्यासह स्थायी समितीचे सदस्य, क्रीडा विभागासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते. कपूर दाम्पत्य हे पिंपरी चिंचवड शहरातील पहिले ‘आयर्नमॅन’ ठरले आहेत. कपूर दांपत्याच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे पिंपरी-चिंचवड शहराचा नावलौकिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढला असून, संपूर्ण शहरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

‘फिटनेस’ला वयाचे बंधन नसते: दिनेश कपूर

सत्काराला उत्तर देताना दिनेश कपूर यांनी आपल्या प्रवासाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, “वयाच्या पन्नाशीनंतर ही स्पर्धा पूर्ण करणे हे माझ्यासाठी एक स्वप्न होते. फिटनेससाठी वय हा कधीही अडथळा नसतो; गरज असते ती केवळ प्रबळ इच्छाशक्ती, शिस्तबद्ध जीवनशैली आणि सातत्याची. टाटा मोटर्समधील माझ्या सेवाकाळात फुटबॉल खेळल्याचा फायदा मला या स्पर्धेसाठी झाला.” योगिता कपूर यांनी या प्रवासात एकमेकांना मिळालेल्या मानसिक आधाराचे महत्त्व अधोरेखित केले.

कपूर दांपत्याचे हे यश केवळ एक पदक नाही, तर ते पिंपरी-चिंचवडच्या जिद्दीचे आणि संयमाचे प्रतीक आहे. आजच्या धकाधकीच्या युगात, जिथे अनेकजण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, तिथे वयाच्या पन्नाशीनंतरही आरोग्याप्रती इतके समर्पण ठेवून, हजारो किलोमीटर दूर जाऊन, पिंपरी चिंचवड शहराचे नव्हे तर महाराष्ट्र राज्याचे व देशाचेही नाव उंचावणे ही खरोखरच थक्क करणारी आणि अभिमानास्पद बाब आहे. थेरगावच्या मातीत निर्माण झालेले हे खेळाडू आज जागतिक स्तरावर आदर्श ठरले आहेत. त्यांच्या या यशामुळे आपल्या शहरातील युवा पिढीला आणि विशेषतः महिलांना तंदुरुस्तीचे (Fitness) महत्त्व समजेल. त्यांच्या भावी वाटचालीस आमच्याकडून शुभेच्छा.

– अभिषेक बारणे, सभापती स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button