सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ‘जेएनयू’पेक्षाही डावे..; ‘जेएनयू’च्याच कुलगुरूंचे विधान

पुणे | जवाहरलाल नेहरू विद्यापीठापेक्षा (जेएनयू) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ डावे आहे, असं विधान जेएनयूच्या कुलगुरू डॉ. शांतिश्री धुलिपुडी पंडित यांनी केले आहे. मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काम केले आहे. तेथे शिकल्यावर तर कुठेही राजकारण करता येईल. त्या जोरावरच मी ‘जेएनयू’मध्ये चांगले काम करू शकले, असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मृति व्याख्यानात ‘नव्या युगातील भारतीय समाज : संधी आणि आव्हाने’ या विषयावर जेएनयूच्या कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडित यांनी आपले विचार मांडले.
जेएनयूच्या कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडित म्हणाल्या, की डाव्यांचे कथन अतिशय मजबूत आहे. डावे लोकच क्रांतिकारी असू शकतात, असे आजवर पुढे आणण्यात आले. मात्र, वासुदेव बळवंत फडकेही क्रांतिकारक होते, हे लोकांसमोर आणले पाहिजे. पुण्यासारख्या बुद्धिवंतांच्या शहरातून हे कथन सुरू झाले पाहिजे. त्यासाठी लेखन करावे लागेल, बोलावे लागेल. स्वातंत्र्य चळवळ अहिंसक होती, हे दाखविण्यासाठी क्रांतिकारकांना बदनाम करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर हयात असेपर्यंत त्यांना ज्या प्रकारची वागणूक देण्यात आली, तो त्यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाचा अपमान होता.
राहुल गांधी, सोनिया गांधी यांना पोर्ट ब्लेअरला पाठवून त्या खोलीत ठेवा. कोणता काँग्रेस नेता मंडाले किंवा पोर्ट ब्लेअरला पाठवला गेला होता, सगळ्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट होती. तरीही, आज येऊन भाषणे करतात. आपल्या क्रांतिकारकांचा आपण सन्मान राखला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना आज धोक्यात आहे. धार्मिक लोकसंख्या असमतोल हे त्याचे कारण आहे. हिंदू बहुसंख्याक असेपर्यंतच भारत धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देश राहणार आहे,असं डॉ. शांतिश्री पंडित म्हणाल्या.
हेही वाचा : WPL ला आजपासून सुरुवात; जाणून घ्या मोबाईलवर कुठे पाहता येतील सर्व सामने
मध्यमवर्गीय टीका चांगली करतात. मात्र, निवडणुकीवेळी मतदान करत नाहीत. महाराष्ट्रात पाच टक्के मतदान वाढल्यावर काय निकाल लागला पाहा. ही मध्यमवर्गीयांची शक्ती आहे. मध्यमवर्गीयांनी आपली जबाबदारी झटकल्यास देश विकसित होणार नाही. भारतीय ज्ञान व्यवस्था मजबूत केली पाहिजे. शालेय स्तरापासून चांगली पुस्तके उपलब्ध झाली पाहिजेत. प्राध्यापकांनी लेखन केले पाहिजे, असं डॉ. पंडित यांनी नमूद केले.
हिंदू समाज एकत्र आला, तरच पुढे जाणे शक्य आहे, हे सावरकरांनी पतितपावन संघटनेच्या माध्यमातून सांगितले होते. नुसत्या आर्थिक विकासाने काही होणार नाही. त्याबरोबर राजकीय सत्ता ही कथनशक्तीवर अवलंबून असते. डाव्यांनी खोटे बोलून इतिहासात गोंधळ घातला आहे. भारतीय संस्कृती दहा हजार वर्षांपेक्षा जुनी आहे, हे ‘कार्बन डेटिंग’मधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाश्चात्यांनी आपल्याला सुसंस्कृत केलेले नाही, तर आपण त्यांना सुसंस्कृत केले आहे. हे आपण बोलले पाहिजे. डाव्यांना पुरातत्त्वशास्त्र आवडत नाही. म्हणून सध्या ‘डिग फॉर कम्युनल’ असा नवा नारा देण्यात येत आहे, असं डॉ. शांतिश्री पंडित म्हणाल्या.
मी उघडपणे सांगते, मी संघाची : डॉ. शांतिश्री पंडित
जेएनयूमध्ये आजपर्यंत एकही स्त्री कुलगुरू झाली नाही. ही परंपरा संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदलली. त्यांनी नारीशक्तीबाबत जे बोलले, ते करून दाखवले. ‘जेएनयू’ने आयआयएम, आयआयटींना क्रमवारीत मागे टाकले आहे. ‘जेएनयू’ला सर्वोत्तम शैक्षणिक क्रमवारी मिळवून दिलेली मी पहिली ‘संघी’ आहे. अनेक लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वापर करून पदे मिळवतात आणि नंतर लपवाछपवी करतात. पण, मी उघडपणे सांगते, मी राष्ट्रसेविका समितीची आहे, असेही डॉ. शांतिश्री पंडित म्हणाल्या.