शिवसृष्टीच्या दुसर्या टप्प्याचे शिवजयंतीला लोकार्पण; मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

पुणे: महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव बुद्रुकमध्ये साकारत असलेल्या शिवसृष्टीचा दुसरा टप्पा आता पूर्णत्वास आला असून, शिवजयंतीच्या दिवशी लोकार्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त जगदीश कदम, विनीत कुबेर, सल्लागार संदीप जाधव व व्यवस्थापक अनिल पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या उपक्रमाचे लोकार्पण बुधवारी (दि. 19 फेब्रुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. या टप्प्यामध्ये प्रामुख्याने एक भव्य स्वागत कक्ष, एखाद्या आधुनिक थीम पार्कला साजेल, असे टाइम मशिन थिएटर व तुळजाभवानीमातेचे भव्य मंदिर यांचा समावेश आहे.
या टप्प्याच्या निर्मितीमध्ये सुमारे 87 कोटी रुपये इतकी गुंतवणूक केली असून, स्वदेश, स्वधर्म व स्वभाषा ही शिवाजी महाराजांना जवळची असणारी महत्त्वाची तीन तत्त्वे यावर या टप्प्याच्या निर्मितीमध्ये विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
हेही वाचा – वक्फ संशोधन विधेयक संयुक्त संसदीय समितीचा अहवाल राज्यसभेच्या पटलावर
दालनामध्ये छत्रपती श्रीशिवाजी महाराजांचे सहा मोठे पोर्ट्रेट्स लावण्यात आले आहेत. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या भोसले घराण्याचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानीमातेचे मंदिर या टप्प्यात साकारण्यात आले आहे व आता शिवसृष्टी पाहण्यासाठी येणार्या शिवप्रेमींना दर्शनासाठी खुले असणार आहे.
मंदिर हे प्रतापगडावरील भवानीमातेच्या मंदिराची तंतोतंत प्रतिकृती असून, अगदी बांधकामात वापरण्यात आलेला दगडदेखील सारखा आहे. येत्या 17 फेब्रुवारीला तुळजाभवानीमातेच्या मूर्तीची मंदिरात विधिवत स्थापना करण्यात येणार आहे. ही मूर्ती मूर्तिशास्त्राचे अभ्यासक व तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली घडवण्यात आली आहे.टाइम मशिन थिएटरचे आकर्षण
या थिएटरमध्ये आपण सुमारे 1000 वर्षे मागे जातो व तिथून श्रीशिवाजी महाराजांच्या काळात येतो. महाराजांना महत्त्वाची असणारी तीन तत्त्वे स्वदेश, स्वधर्म व स्वभाषा याद्वारे ते लोकांशी कसे जोडले गेले होते, यावर आधारित कथा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिवप्रेमींना अनुभवता येणार आहेत. यामध्ये मॅपिंग, होलोग्राफी, फिजिकल इफेक्ट्स व सर्वात महत्त्वाचे म्हणजे 360 अंशांमध्ये फिरणारे रोटेटिंग अर्थात फिरते थिएटर ज्यावर एका वेळी 110 व्यक्ती या विशेष अशा 33 मिनिटांच्या शोचा अनुभव घेऊ शकतील.