राज्यात पुढील काही दिवस पावसाचे; ‘या’ भागांना हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’

मुंबई : राज्यातील अनेक भागात मागील काही दिवसांपासून पावसाची नोंद होत आहे. काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यांसह गारपीटही नोंदली गेली. दरम्यान, राज्यातील काही भागांना पुढील तीन ते चार दिवस हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर काही भागात उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार आहे.
राज्यातील हवामान झपाट्याने बदलत असून काही भागात तीव्र उष्णतेचा, तर काही भागात पाऊस आणि गारपीट यांसह सोसाट्याच्या वाऱ्याची नोंद होत आहे. पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणातील तूरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुढील तीन ते चार दिवस राज्यातील दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकण प्रदेशातील ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी भागात उष्ण आणि दमट हवामान आहे. यामुळे उत्तर कोकणातील काही प्रदेशात कमाल तपामानातही वाढ झाली आहे. या भागात गुरुवारीही उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार आहे. तर पुढील तीन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कमाल तापमानात १ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, बुधवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद अकोला येथे झाली. येथील कमाल तापमान ४०.७ अंश सेल्सिअस होते.
हेही वाचा – ‘राज्यात गुन्हेगारीत घट; न्याय व्यवस्थेत महाराष्ट्र आघाडीवर’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, सातारा आणि सातारा घाट विभाग, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव, तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ आदी भागातील तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट यांस ताशी ४० ते ५० किलोमीटर वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मुंबईत मागील तीन दिवसांपासून पारा ३६ अंशावर स्थिर झाला होता. सध्या मुंबईत उष्ण आणि दमट वातावरण आहे. किमान तापमानात वाढ झाली असल्याने रात्रीच्या वेळी जाणवणारा गारवाही कमी झाला आहे. दुपारच्या वेळी नागरिकांना तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. दरम्यान, बुधवारी हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात ३४.६, तर कुलाबा केंद्रात ३२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुरुवारीही शहरातील कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.





