राज्यात ८ दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता, टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे संकेत
मुंबई – राज्यात वाढत्या रुग्णसंख्येवर आळा बसवण्यासाठी लॉकडाऊन लावण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यातच, आज मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीत ८ दिवसांचा लॉकडाऊन लावण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं समोर येतंय. या बैठकीत डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’मध्ये मुंबईसह राज्यातील नामवंत डॉक्टरांचा समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत लॉकडाऊनबाबात निर्णय घेण्याकरता बैठक बोलावली होती. त्यानंतर आज पुन्हा टास्क फोर्ससोबत चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन हवा, असं मत टास्क फोर्सच्या बैठकीत मांडलं. पण टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी निदान 14 दिवसांचा लॉकडाऊन लागू झाला तर परिस्थिती नियंत्रणात येईल, असं मत मांडलं. त्यामुळे टास्क फोर्सचे तज्ज्ञ देखील लॉकडाऊनच्या बाजूने आहेत. याबाबत लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
आरोग्य यंत्रणेवर असलेला ताणही कमी झाला पाहिजे
बेड्सची संख्या, ऑक्सिजन उपलब्धता आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता या विषयावर टास्क फोर्सच्या बैठकीत तज्ज्ञांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चिंता व्यक्त केली. आरोग्य यंत्रणेवर असलेला ताणही कमी झाला पाहिजे, असं मत डॉक्टर्सनी व्यक्त केलं. राज्यात 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन असावा, असं मत डॉक्टर तात्याराव लहानेंनी व्यक्त केलंय.
लॉकडाऊन लागण्याआधी जनतेला 1 ते 2 दिवसांचा वेळ मिळण्याची शक्यता
लॉकडाऊन लागण्याआधी जनतेला 1 ते 2 दिवसांचा वेळ मिळण्याची शक्यता आहे. नव्या स्ट्रेनबाबत उपाययोजनेची आवश्यकता असल्याचं मतंही डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केलंय. 14 दिवसांच्या कडक लॉकडाऊननेच कोरोनाची साखळी तुटेल, असं टास्क फोर्सच्या डॉक्टरांचं मत आहे.





