महाराष्ट्रात मान्सून सक्रिय! मुंबईत संततधार, पुण्यात मुसळधार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट!

पुणे | प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर मान्सूनने महाराष्ट्रात आपली घोडदौड वेगवान केली आहे. हर्णे आणि सोलापूर येथे रखडलेल्या मान्सूनने सोमवारी मुंबई, पुणे आणि रायगड जिल्ह्यातील अलिबागपर्यंत यशस्वी मजल मारली. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाड्याने हैराण झालेल्या मुंबई आणि पुणेकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. २८ जूनपर्यंत राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची संततधार सुरू झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), भायखळा, वरळी, मालाड, जोगेश्वरी आणि बोरिवली या भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. पाऊस सुरू झाल्याने शहरातील तापमानात घट झाली असून उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे. आज मुंबईसह पालघर आणि ठाणे जिल्ह्याला वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
पुण्यात मुसळधार
मुंबईत रिमझिम सुरू असताना पुण्यात मात्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुण्याच्या जुन्नर परिसरात आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच पर्यटन स्थळ असलेल्या माळशेज घाट ते अणे पठार परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. दुसरीकडे, मुसळधार पावसाचा फटका छत्रपती संभाजीनगरला बसला आहे. वैजापूर तालुक्यातील तलावाडा शिवरात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे तेथील वाहतुकीसाठी तात्पुरता बांधलेला पूल वाहून गेला आहे.
हेही वाचा
पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालय, परेड ग्राउंड होणार ताथवडेत!
कोकणात भात रोपांना नवसंजीवनी
मान्सून अलिबाग, निझामाबाद, दंतेवाडा आणि सुंदरगढपर्यंत पोहोचल्यामुळे कोकणातही पावसाचे दमदार आगमन झाले आहे. जून महिना संपत आला तरी पाऊस नसल्याने कोकणातील शेतकरी चिंतेत होता. मात्र, या पावसामुळे उन्हाने करपू लागलेल्या भात रोपांना नवसंजीवनी मिळाली असून बळीराजा सुखावला आहे. येत्या ४८ तासांत मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.
२८ जूनपर्यंत धो-धो पावसाचा इशारा
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २८ जूनपर्यंत कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान बिघडलेले राहील. या काळात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची दाट शक्यता आहे. काही तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामुळे नागरिकांना आणि विशेषतः मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा व सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.





