पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह! पीकअप वाहनाची ४ ते ५ वाहनांना धडक; महिला ठार, दोघे जखमी
पुणे | पुण्यात ड्रिंक अँड ड्राईव्हमुळे होणाऱ्या अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. पुण्यात आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात एक पिकअप चालकाने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत ४ ते ५ वाहनांना धडक दिल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रिकांत अमराळे हे गंभीर जखमी तर पत्नी गीतांजली अमराळे यांचा मृत्यू झालाय. जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील करिश्मा चौक ते पौड फाटा या रस्त्यावर रात्री ११ वाजता ही घटना घडली आहे. एका मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या चालकाने त्याच्याकडील पीकअपने ४ ते ५ वाहनांना धडक दिली. अपघातातील वाहन-टेम्पो नंबर MH १२ UM ७८२१ याने एक चारचाकी, तीन दुचाकी आणि एका रिक्षाला धडक दिली आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन
या अपघातात सहा ते सात जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी सह्याद्री रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर नागरिकांनी पिकअप चालकाला पकडलं आणि बेदम चोप दिला. पोलिसांना हा प्रकार कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी आरोपी पिकअप चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.