“आमची गाडी छान चालली आहे; तिघंही तीन शिफ्टमध्ये चालवतो”, समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणानंतर मुख्यमंत्र्यांची मिश्किल टिप्पणी

Samruddhi Highway Phase 3: मुंबई-नागपूर दरम्यानच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या ७६ किमी लांबीच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण आज (५ जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. इगतपुरी येथील बोगद्यातील उत्तरेकडील मार्गिकेवर नुकताच हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकाच गाडीतून समृद्धी महामार्गावरून प्रवास केला. यावेळी गाडीचे स्टेअरिंग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतले होते. या प्रवासानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “आमची गाडी छान चालली आहे,” अशी मिश्किल टिप्पणी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही तिघेही एकत्र गाडी चालवत आहोत, काही काळजी करू नका. आम्हाला एकमेकांच्या गाडीत बसायची सवय आहे. आमची गाडी एकदम छान चालली असून तिघेही ती तीन शिफ्टमध्ये चालवत आहोत.”
हेही वाचा – राज्यात यंदा दहा कोटी वृक्ष लागवड करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
या लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, “महायुतीच्या कार्यकाळातच या महामार्गाचे उद्घाटन होत असल्याचा आनंद आहे. आता अशाच प्रकारचा शक्तीपीठ महामार्ग आम्हाला पुढच्या टप्प्यात करायचा आहे. हा शक्तीपीठ महामार्ग संपूर्ण मराठवाड्याचे चित्र बदलणारा, मराठवाड्यात आर्थिक बदल घडवणारा असणार आहे. त्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे.”
मुंबई-नागपूर अंतर १६ तासांऐवजी केवळ आठ तासात पार करता यावे यासाठी एमएसआरडीसीने ७०१ किमी लांबीचा आणि सुमारे ५५ हजार कोटी रुपये खर्चाचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेतला होता. राज्यातील १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांमधून जाणाऱ्या सहा पदरी महामार्गाचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात आले आहे.
७०१ किमी महामार्गातील नागपूर-शिर्डी दरम्यानच्या ५२० किमी लांबीच्या महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर २६ मे २०२३ रोजी शिर्डी-भरवीर दरम्यानच्या ८० किमी लांबीच्या महामार्गाचे लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. तर भरवीर-ते इगतपुरी दरमयानच्या २५ किमी लांबीच्या महामार्गाचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ४ मार्च २०२४ रोजी झाले होते.