550 कोटींच्या आरोपानंतर आयपीएस सुपेकरांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : आयपीएस अधिकारी डॉ. जालिंदर सुपेकर यांच्यावर नुकत्याच झालेल्या गंभीर आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. अमरावती येथील वकिलाने सुपेकर यांच्यावर थेट 550 कोटींची मागणी केल्याचा आरोप केला असून, काही कैद्यांकडून 300 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली, असा दावा देखील समोर आला आहे. या आरोपांवर आता सुपेकरांनी प्रथमच अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.
सुपेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत त्यांना “धादांत खोटे, निरर्थक आणि केवळ बदनामीसाठी केलेले” ठरवले आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, १९ ऑगस्ट २०२३ रोजी अमरावती कारागृहात त्यांची नियमित कामकाज पाहणी होती, जेव्हा ते कारागृहाच्या स्वच्छता, बंदिवानांच्या बारक्यांसह विविध बाबींचा आढावा घेण्यासाठी गेले होते. त्या भेटीवेळी कोणत्याही बंदीवानाशी थेट संवाद झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“कोणत्याही कैद्याशी बोलणे किंवा भेट घेणे हे घटनात्मकदृष्ट्या मान्य नाही. तरीदेखील बातम्यांमध्ये आम्ही अमुक कैद्याला भेटलो, पैसे मागितले, असे आरोप केवळ आमच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी केले जात आहेत,” असे सुपेकर म्हणाले.
शेतकरी नेते राजू शेट्टी यांनीही बंदिवानांच्या दिवाळी फराळासाठी आलेल्या निधीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप सुपेकरांवर केला आहे. मात्र, यावरही सुपेकरांनी मौन न ठेवता याचेही खंडन केले.
निलंबनासंदर्भातही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्यांना फक्त वरिष्ठांचं ऐकलं नाही म्हणून निलंबित केलं जात नाही. यामागे चौकशी अहवाल आणि ठोस कारणं असतात, असं त्यांनी स्पष्ट केलं. “कार्यप्रणालीमध्ये गलथानपणा, जबाबदारीचा भंग किंवा खात्याविरोधात कृती केल्यास योग्य चौकशीनंतरच निलंबन होते,” असंही त्यांनी सांगितलं.
सुपेकरांच्या स्पष्ट आणि ठाम भूमिकेमुळे या प्रकरणाला आता नव्या वळणाची शक्यता आहे. आरोपांची गंभीरता लक्षात घेता, यापुढील तपास व कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.