Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

BIG NEWS: पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा आमदार महेश लांडगे यांचा ‘‘आदर्श’’

राजकीय स्पर्धा बाजुला ठेवून रवि लांडगे यांना ‘‘महापौरपदी’’ संधी : गावकी-भावकीचा एकोपा अन्‌ शहराच्या विकासाला प्राधान्य

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने बहुमत मिळवले. त्यानंतर आता महापौर- उपमहापौर कोण होणार? याबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अखेर भाजपाच्या प्रदेश नेतृत्त्वाने महापौरपदासाठी भोसरीतील बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे यांच्या नावावर, तर उपमहापौर पदासाठी पिंपरीतील विजय उर्फ शितल शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा नव्या महापौरपदाची निवड शुक्रवारी (दि. 6) होणार आहे. त्या दिवशी महापालिकेची पहिली विशेष सर्वसाधारण सभा आहे. त्यावेळी महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. तत्पूर्वी, सोमवारी (दि. 2) उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले.

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी महापौर व उपमहापौर या दोन महत्त्वाच्या पदांसाठी नामनिर्देशन पत्र शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना पाठवले आहे. त्यामध्ये महापौरपदासाठी रवि लांडगे आणि उपमहापौरपदासाठी शितल उर्फ विजय शिंदे यांच्या नावाचा उल्लेख आहे. यानुसार पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश प्रदेशाध्यक्षांनी दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद खुला होताच शहराच्या राजकारणात एकच नाव ठामपणे पुढे येत आहे ते म्हणजे भाजपाचे दोनवेळा बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रवि लांडगे. भोसरीतील प्रभाग क्रमांक ६ मधून २०१७ आणि २०२६ असे सलग दुसऱ्यांदा रवि लांडगे हे बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांचे चुलते कै. अंकुशराव लांडगे हे भाजपचे माजी शहराध्यक्ष होते. त्यांनी पिंपरी-चिंचवडवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व असताना भाजपाला उभारी दिली होती. त्या विपरीत राजकीय परिस्थितीत आणि कठीण काळात कै. अंकुशराव लांडगे यांनी भाजपचे दोन अंकी नगरसेवक निवडून आणत शहरातील राजकीय गणित बदलण्याची मुहूर्तमेढ रोवली होती.

आमदार महेश लांडगे यांचा आदर्श…

विधानसभा निवडणुकीत रवि लांडगे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला होता. आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचा दावा केला होता. विधानसभा निवडणुकीनंतर आमदार लांडगे यांनी गावकी-भावकी एकत्र करण्याचा प्रयत्न केला. त्याला महानगरपालिका निवडणुकीत मूर्त स्वरुप मिळाले. रवि लांडगे भाजपात स्वगृही परतले. त्यानंतर निवडणुकीतील विजयानंतर पहिले महत्त्वाचे पद कै. अंकुशराव लांडगे यांच्या कुटुंबियांमध्ये देण्याचा मोठेपणा दाखवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आता रवि लांडगे यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे. भाजपाचे संपूर्ण बहुमत आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे गावकी-भावकी एकत्रिकरणावर शिक्कामोर्तब झाले असून, कथित मतभेदांना पूर्णविराम देत शहराच्या विकासाच्या मुद्यावर महेश लांडगे यांनी राजकीय आदर्श निर्माण केला आहे.

शत्रुघ्न काटे, राहुल कलाटे, नवनाथ जगताप यांचा प्रतिक्षाच…

महापौरपदासाठी भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, नगरसेवक राहुल कलाटे आणि नवनाथ जगताप तीव्र इच्छुक होते. मात्र, त्यांना आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. कारण, चिंचवडमधून कोणाला महापौरपदी संधी द्यायची यावर शेवटपर्यंत एकमत झाले नाही, असे समजते. महापौरपदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा आहे. त्यामुळे भाजपाकडून पाच वर्षांच्या काळात किमान 2 इच्छुकांना महापौरपद मिळू शकते. किंबहुना, पक्षश्रेष्ठींनी ठरवल्यास सदर कार्यकाळ कमी करुन जास्तीच्या इच्छुकांना संधी देण्याची भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. आता स्थायी समिती सभापतीसारख्या महत्त्वाच्या पदावर कोणाला संधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button