Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

प्रभागनिहाय रक्तदान शिबिरे आयोजित करा : नगरसेवक डॉ. सुहास कांबळे

‘वायसीएम’ रुग्णालयातील रक्तटंचाई गंभीर; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे मागणी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय येथे सध्या चिंताजनक रक्तटंचाई निर्माण झाली असून, उपलब्ध रक्तसाठा केवळ पुढील १५ ते २० दिवस पुरेल इतकाच उरल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर शहर सुधारणा समितीचे सदस्य डॉ. सुहास कांबळे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देत, शहरातील सर्व प्रभागांमध्ये प्रभागनिहाय रक्तदान शिबिरे आयोजित करण्याची मागणी केली आहे, ज्यावर आयुक्त डॉ. परदेशी यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली.

नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, वायसीएम रुग्णालयामध्ये दररोज सरासरी ६० ते ८० रक्तपिशव्यांची आवश्यकता भासते. मात्र सध्या उपलब्ध असलेला रक्तसाठा अपुरा पडत असल्याने आपत्कालीन उपचार, शस्त्रक्रिया तसेच गंभीर रुग्णांच्या उपचारांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून तातडीच्या उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताफ्यात ५० नवीन वाहने दाखल

रक्तसंकलन वाढविण्यासाठी महापालिका प्रशासनाने अधिक नियोजनबद्ध व व्यापक स्तरावर कार्यवाही करावी, अशी भूमिका मांडताना डॉ. कांबळे यांनी चार महत्त्वाच्या उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक प्रभागात नियोजित वेळापत्रकानुसार नियमित रक्तदान शिबिरे आयोजित करणे, त्यासाठी स्थानिक नगरसेवक, सामाजिक संस्था व स्वयंसेवी संघटनांचा सहभाग घेणे, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच रक्तदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचावे यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली आहे. सोशल मीडिया, स्थानिक वृत्तपत्रे, होर्डिंग्ज तसेच शाळा व महाविद्यालयांमधून प्रचार केल्यास नागरिकांचा प्रतिसाद वाढू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

स्थानिक पातळीवर नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्या, युवक मंडळे व महिला मंडळांना प्रोत्साहन देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक शहर असल्याने विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये विशेष रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना नागरिकांना आरोग्याविषयक सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात याची गांभीर्याने दखल घेतली जाते. सध्या जाणवत असलेला रक्ताचा तुटवडा हा गंभीर विषय आहे. याबाबत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देऊन विविध मागण्या केल्या आहेत.. त्यावर उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचे आयुक्त महोदयांनी आश्वासित केले आहे. प्रभागनिहाय रक्तदान शिबीरे व जनजागृतीने हा प्रश्न सुटेल असा विश्वास आहे.

– डॉ. सुहास कांबळे, नगरसेवक, सदस्य, शहर सुधारणा समिती.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button