महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय; लवकरच होणार ८ हजार ६६९ पदांची भरती

Aditi Tatkare : महिला व बाल विकास विभागात मोठी भरती होणार आहे. तब्बल 23 वर्षांनंतर महिला व बाल विकास विभागाने ८ हजार ६६९ नियमित पदे भरण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
त्याचसोबत, बाह्ययंत्रणेद्वारे २ हजार ८४३ पदे आणि अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या २ लाख २१ हजार ३२८ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, ‘या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार आहे. महिला व बाल विकास विभागातील एकूण पदांचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी काही पदे रद्द करून १६५ नव्या पदांची वाढ करण्यात आली आहे.
हेही वाचा – धक्कादायक: छगन भुजबळांचे हेलिकॉप्टर थेट वाहनांच्या पार्किंगमध्ये उतरवले; मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल
त्यामुळे विभागासाठी एकूण ८ हजार ६६९ नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत. २३ वर्षांनंतर घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे महिला व बालकल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल.’
शासन निर्णयानुसार विभागातील काही पदे निरसित (रद्द) करून 165 नव्या पदांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विभागासाठी एकूण 8 हजार 669 नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत. याशिवाय, विभागाच्या कामकाजासाठी 2 हजार 843 पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत 1 लाख 10 हजार 664 अंगणवाडी सेविका व 1 लाख 10 हजार 664 अंगणवाडी मदतनीस, अशी एकूण 2 लाख 21 हजार 328 मानधनाधारित पदे देखील मंजूर करण्यात आली आहेत.





