आता मतदान केंद्रांवर मोबाइल ठेवण्याची सुविधा: निवडणूक आयोगाचा निर्णय

नवी दिल्ली : मतदारांसाठी चांगली बातमी असून त्यांना मतदानावेळी मोबाइल घेवून जाता येणार आहे. कारण आता मतदान केंद्रांवर मोबाइल फोन ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने शुक्रवारी निर्णय घेत मतदारांना मोठा दिलासा दिला आहे. तसेच पक्षांना आणि उमेदवारांना मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारापासून १०० मीटर अंतरावर बूथ उभारण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
निवडणूक आयोगाची शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोगाकडून पत्रकार परिषद घेत माहिती देण्यात आली. या दोन प्रमुख बदलांची अंमलबजावणी वर्षाअखेरीस बिहारमध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीपासून करण्यात येणार आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरी आणि ग्रामीण भागात मोबाइल फोनचा वाढता वापर लक्षात घेता, मतदानाच्या दिवशी केवळ मतदारांनाच नव्हे तर ज्येष्ठ नागरिक, महिला आणि अपंग व्यक्तींनाही मोबाइल फोन वापरण्यात अनेक अडचणी येत आहेत. या अडचणी लक्षात घेता आयोगाने मतदान केंद्राबाहेर मोबाइल ठेवण्याची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत फक्त मोबाइल फोन ठेवण्याची परवानगी असेल आणि तोही स्वीच आफॅ असला पाहिजे. मतदान केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ पिजनहोल बॉक्स किंवा ज्यूट बॅग ठेवल्या जातील, तिथे मतदारांना त्यांचे मोबाइल फोन जमा करावे लागतील. मतदान केंद्राच्या आत मोबाइल फोन नेण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय निवडणूक कायद्यानुसार राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी मतदान केंद्र उभारण्याची परवानगी असलेली मर्यादा मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारापासून १०० मीटरपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. तथापि, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या आसपासच्या १०० मीटरच्या परिघात निवडणूक प्रचाराला परवानगी दिली जाणार नाही. मतदानाच्या दिवशी मतदारांनी आयोगाने जारी केलेले अधिकृत मतदार ओळखपत्र सोबत न आणल्यास उमेदवार मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतरावर बूथ उभारून त्यांना अनधिकृत ओळखपत्रे देऊ शकतील.