पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सज्ज; कोर कमिटीची बैठक संपन्न

पुणे: आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांची कोर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन, पुणे येथे पार पडली. या बैठकीत निवडणूक रणनीती, आघाडीच्या शक्यता आणि शहरातील समस्यांवर चर्चा करून पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे.
बैठकीत शहरातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेत आघाडीच्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. प्रशासनाकडून प्रस्तावित प्रभाग रचनेशी संबंधित संभाव्य तक्रारींची जबाबदारी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांच्याकडे सोपवण्यात आली. यापूर्वी महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कारभारावर टीका करताना, नियोजनशून्य विकास, वाहतूक कोंडी, पावसाळ्यात पाणी साचण्याने होणारे नुकसान आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या चुकीच्या प्रकल्पांमुळे शहराची दुरवस्था झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या सर्व त्रुटींची माहिती पुणेकरांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला.
पक्षाची शहरातील संघटनात्मक रचना अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला असून, सर्व सेल्सना निवडणुकीसाठी सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय, विविध धोरणात्मक आणि संघटनात्मक विषयांवरही सखोल चर्चा झाली.
हेही वाचा – आता मतदान केंद्रांवर मोबाइल ठेवण्याची सुविधा: निवडणूक आयोगाचा निर्णय
या बैठकीला शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेत्या व माजी खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार जगन्नाथबापू शेवाळे, माजी आमदार जयदेव गायकवाड, आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार कमलनानी ढोले पाटील, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, विशाल तांबे, अश्विनी कदम, श्रीकांत पाटील, सचिन दोडके, भगवान साळुंखे, डॉ. सुनील जगताप, पंडित कांबळे, प्रकाश म्हस्के यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
पुणेकरांच्या प्रश्नांना प्राधान्य
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने पुणे महानगरपालिका निवडणुकीत पुणेकरांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून प्रचार करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या कारभारातील त्रुटी उघड करत आणि शहराच्या हितासाठी ठोस उपाययोजना सुचवत निवडणुकीत उतरण्याची रणनीती पक्षाने आखली आहे.