पुढील 36 तास महत्वाचे! महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा धडाका; ‘या’ जिल्ह्यांना रेड-ऑरेंज अलर्ट

पुणे : गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोकण किनारपट्टीसह मुंबई आणि उपनगरांत पुढील 36 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी दिला आहे. अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होऊन उत्तरेकडे सरकत असल्याने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुढील 2-4 दिवस मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचा अंदाज
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी सांगितले की, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, ते पुढील 36 तासांत तीव्र होऊन उत्तरेकडे सरकणार आहे. यामुळे कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडेल. रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नगर, संभाजीनगर, नाशिक आणि सिंधुदुर्ग यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग 35-40 किमी प्रतितास आणि काही ठिकाणी 60 किमी प्रतितासपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
पुढील चार दिवसांचे अलर्ट
हवामान विभागाने (IMD) पुढील चार दिवसांसाठी राज्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. आज (22 मे) रत्नागिरीसाठी रेड अलर्ट, तर मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या (23 मे) रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नगर, संभाजीनगर, नाशिक आणि सिंधुदुर्ग यांना ऑरेंज अलर्ट आहे. उर्वरित भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. शनिवार आणि रविवारी (24-25 मे) कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट, तर उर्वरित राज्यात यलो अलर्ट कायम राहील.
हेही वाचा – ‘सुप्रिया सुळे लवकरच केंद्रात मंत्री दिसतील’, संजय शिरसाट यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
‘शक्ती’ चक्रीवादळाचा संभाव्य धोका
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ‘शक्ती’ चक्रीवादळाचा संभाव्य धोका वाढल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. रत्नागिरी आणि सातारा येथे अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट, तर मुंबई आणि पालघरमध्ये मुसळधार आणि ठाण्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. साताऱ्याच्या घाट परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन-चार दिवस पाऊस धुमाकूळ घालणार आहे. ठाण्यात आजपासून, तर मुंबई आणि पालघरमध्ये उद्यापासून अतिवृष्टीला सुरुवात होईल. रायगड आणि रत्नागिरीत 25 मेपर्यंत पावसाचा जोर कायम राहील, तर सिंधुदुर्गात सलग पाच दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, अहिल्यानगर आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात दोन दिवस ऑरेंज अलर्ट आहे. मराठवाड्यात परभणी, बीड, नांदेड आणि लातूर येथे आज, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाचा इशारा
हवामान विभागाने नागरिकांना 50-60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. सखल भागात पाणी साचणे, कमकुवत झाडे पडणे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मच्छिमारांना 25 मेपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण
IMD च्या अंदाजानुसार, पुढील 2-3 दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. पूर्वमध्य अरबी समुद्रात सध्या नैऋत्य मोसमी पावसाचे वातावरण तयार होत असून, कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. यामुळे कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः कोकण आणि घाट परिसरातील रहिवाशांनी पूरजन्य परिस्थिती आणि भूस्खलनाच्या धोक्यापासून सावध राहावे, असे सांगण्यात आले आहे.