गोकुळच्या अध्यक्षपदी नविद मुश्रीफ

कोल्हापूर : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक अखेर संपली असून, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून गोकुळच्या राजकारणात खळबळ माजली होती. माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने कोण होणार नवा अध्यक्ष, याची चर्चा रंगली होती. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट हस्तक्षेप करत महायुतीच्या नेत्याला अध्यक्षपद मिळावे, अशी भूमिका घेतली. यामुळे शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते, परंतु अखेरच्या क्षणी नविद मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
गुरुवारी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनात अडीच तास चाललेल्या बैठकीत नविद यांचे नाव बंद लिफाफ्यातून ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. नविद परदेशात असल्याने त्यांना तातडीने कोल्हापुरात बोलावण्यात आले. हसन मुश्रीफ यांनी सुरुवातीला नविद यांच्या निवडीला विरोध केला होता, परंतु त्यांच्याच नावाला अंतिम मान्यता मिळाली. यामुळे गोकुळवर राज्यपातळीवरील हस्तक्षेप स्पष्ट झाला.
हेही वाचा – गृहप्रकल्पात फ्लॅट घेतलेल्या ग्राहकांची फसवणूक; मकरंद पांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असून, आता गोकुळही त्यांच्या कुटुंबाकडे आले आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफ यांची पकड आणखी मजबूत झाली आहे. गोकुळ आणि जिल्हा बँकेचा कारभार शेतकऱ्यांशी थेट जोडलेला आहे. दरम्यान, सतेज पाटील यांची कोंडी करण्याचा महायुतीचा प्रयत्नही यानिमित्ताने दिसून आला. अरुण डोंगळे यांचे बंड शांत झाले असले तरी महाडिक गटाच्या हालचालींमुळे गोकुळमध्ये काही वेगळे घडेल का, अशी चर्चा रंगली होती. मात्र, संचालकांच्या एकजुटीमुळे त्याचा परिणाम झाला नाही.