रत्नागिरी जिल्ह्यात नैसर्गिक शेती अभियान, जिल्ह्यातील ६५०० शेतकऱ्यांच्या पुढाकाराने २६०० हेक्टर जमीन पिकाखाली येणार

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी नैसर्गिक शेती अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी ६५०० शेतकऱ्यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील २६०० हेक्टर पिकाखाली आणण्यात येणार आहे. हे अभियान डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी नैसर्गिक शेती अभियान राबविण्यासाठी ५२ शेतकरी गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक गटात १२५ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. हे नैसर्गिक शेती अभियान विषमुक्त शेतमाल उत्पादन या उद्देश्याने राबविण्यात येत आहे. कृषी विभाग व ‘आत्मा’ यांच्या प्रयत्नातून नैसर्गिक शेती अभियान राबविताना विषमुक्त अन्नधान्य उत्पन्नावर भर देण्यात आला आहे.शेतीतील रासायनिक खताचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेवून नैसर्गिक शेतीवर भर देण्यात आला आहे. यासाठी शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात येत असून, त्यासाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा – पुण्यात फर्ग्युसन रस्त्यासह अनेक ठिकाणी अतिक्रमणांवर कारवाई करून पदपथ मोकळे
शाश्वत शेतीला चालना देणे, रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करणे, जमिनीचे आरोग्य सुधारणे जैवविविधतेला प्रोत्साहन देणे या उद्देश्याने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान राबविण्यात येत आहे. नैसर्गिक घटकाचा वापर करून विषमुक्त शेतमाल तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकरी स्वतःहून तयार होत आहेत. या अभियानामुळे रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर न केल्यामुळे खर्च कमी होणार आहे. जमिनीचे आरोग्य सुधारणार आहे. जैविक घटकांचा वापरामुळे मातीची सुपीकता वाढण्यास मदत होईल.