Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खासदार अशोक चव्हाण चिमुकल्यांच्या आनंदात सहभागी ! शाळा भेटीच्या उपक्रमामध्ये भोकरच्या जि.प. शाळेमध्ये उपस्थिती

नांदेड : मुंबईतील नामांकित इंग्रजी शाळेत आपले शालेय शिक्षण पूर्ण करणारे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी सकाळी भोकर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हजर राहून नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या आनंदात आपला सहभाग नोंदविल्याचे आगळे दृश्य बघायला मिळाले.

सुमारे दोन महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर जिल्ह्यातील जिल्हा परिषदा आणि खासगी शिक्षण संस्थांच्या मराठी शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. तत्पूर्वी शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या प्रमुखांनी पहिल्या दिवशी एका शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार माजी मुख्यमंत्र्यांची उपस्थिती आणि भेटीचा मान भोकरच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला मिळाला.

नांदेड शहरामध्ये वास्तव्यास असलेले चव्हाण सकाळीच भोकरला रवाना झाले. त्यांचे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आगमन झाल्यानंतर स्वागताचा सोपस्कार पूर्ण करण्यात आला. नंतर समाजमाध्यमातून या शाळा भेटीची नोंद करताना, आज माझ्या शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे तसेच विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा –  Mumbai Rain Update: पावसाने मुंबईला दिवसभर झोडपले, उद्या कसे असेल हवामान?

स्वतः अशोक चव्हाण यांनी आपल्या विद्यार्थिदशेतील आठवणींची नोंद आतापर्यंत कोठेही केलेली नाही. पण त्यांच्या मातुश्री दिवंगत कुसुमताई चव्हाण यांनी आपल्या मुलाच्या शैक्षणिक कारकिर्दीचा उल्लेख त्यांच्या ‘कुसुमांजली’ या पुस्तकामध्ये केलेला आहे. त्यानुसार अशोक यांचे शालेय शिक्षण मुंबईतील एका इंग्रजी शाळेमध्ये झाले होते. या शाळेत विद्यार्थ्यांचे गट-विभाग निर्माण करून त्याला ‘हाऊस’ असे संबोधले जायचे. अशोक चव्हाण ‘टिळक हाऊस’मध्ये होते आणि या विभागाचे नेतृत्व त्यांच्याकडे होते. नेतृत्वाचा पहिला अनुभव अशोकला प्राथमिक शाळेतच मिळाला, असे कुसुमताईंनी नमूद केले होते.

भोकरच्या शाळा भेटीत चव्हाण यांनी उपस्थित शिक्षक-कर्मचारी व विद्यार्थ्यांसमोर छोटेखानी मनोगत व्यक्त केले. शैक्षणिक क्षेत्रातील बदलांकडे लक्ष ठेवून तसेच विद्यार्थ्यांच्या आधुनिक गरजा लक्षात घेऊन जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक नूतन शाळेने गुणवत्ता चांगली राखल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.चव्हाण यांच्या शाळा भेटीप्रसंगी गटशिक्षणाधिकारी सुधीर गुट्टे, तहसीलदार विनोद गुंडमवार, जगदीश पाटील भोसीकर, रामचंद्र मुसळे, मनोज गिमेकर आदींची उपस्थिती होती.

अशोक चव्हाण यांच्या आधी दिवंगत शंकरराव चव्हाण यांनी प्रदीर्घकाळ भोकर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. भोकरमधील जिल्हा परिषद हायस्कूलची इमारत खूप जुनी आणि जीर्ण झाली असल्यामुळे नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीला निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देतानाच नांदेड जिल्ह्यातील सर्वांत सुंदर शाळा इमारत म्हणून या वास्तूकडे भविष्यात पाहिले जाईल, असे त्यांनी जाहीर केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button