Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मान्सून ४८ तासांत महाराष्ट्रात धडकणार! राज्याला पुढील ४ दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’

Monsoon Update | केरळमध्ये वेळेवर दाखल झाल्यानंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) आपला प्रवास वेगाने सुरू ठेवला आहे. गोवा, कर्नाटक आणि तामिळनाडूचा मोठा भाग व्यापल्यानंतर मान्सून आता महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. पुढील ४८ तासांत मोसमी वारे महाराष्ट्रात अधिकृतपणे प्रवेश करतील, असा ठोस अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे.

अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

मान्सूनच्या आगमनासाठी अरबी समुद्रात अत्यंत अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. ५ ते ११ जून दरम्यान राज्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर ५ ते १० जून दरम्यान ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात सध्या उष्ण व दमट हवामान राहील; मात्र दुपारनंतर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळू शकतात.

हेही वाचा

प्रज्ञानंदचा ऐतिहासिक पराक्रम! प्रतिष्ठेची ‘नॉर्वे चेस’ स्पर्धा जिंकणारा ठरला पहिलाच भारतीय

मराठवाडा आणि विदर्भातही हवामानात मोठा बदल होणार आहे. मराठवाड्याच्या अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात सध्या उष्णतेचा प्रभाव जाणवत असला, तरी ७ ते ९ जून दरम्यान नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली यांसह सर्वच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि ताशी ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

यंदा मान्सूनचा ‘सुसाट’ प्रवास; तापमान ३ अंशाने घटणार

हवामान तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या वाटचालीचा अंदाज काहीसा चुकला असला, तरी केरळमध्ये आल्यानंतर मोसमी वाऱ्यांनी अभूतपूर्व वेग घेतला आहे. एरवी कर्नाटकच्या करवार परिसरात काही दिवस रेंगाळणारा मान्सून यंदा अवघ्या २४ तासांत गोव्याच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचला.

या वेगवान प्रगतीमुळे पुढील ४८ तासांत राज्यातील कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा आणि तीव्र उष्णतेने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना आणि बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button