“अजितदादा हे माझ्या राजकीय आयुष्याचे प्रेरणास्थान; त्यांच्या स्मृतीस्थळी अभिवादनासाठी बारामतीला गेलो” : विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर
महापालिकेतील जयंती कार्यक्रमास अनुपस्थितीबाबत विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांचा खुलासा; 'वेळेअभावी उपस्थित राहता आले नाही, क्षमस्व'

पिंपरी- चिंचवड: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी बारामती येथे गेल्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहता आले नसल्याचा खुलासा विरोधी पक्षनेते भाऊसाहेब सोपानराव भोईर यांनी केला आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्व. अजितदादा पवार यांचे माझ्या राजकीय जीवनात सिंहाचा वाटा असून, त्यांच्याशी राजकारणापलीकडे जिव्हाळ्याचे आणि अतूट नाते होते. त्यांच्या दुःखद निधनानंतर प्रथमच त्यांची जयंती साजरी होत असल्याने त्यांच्या स्मृतीस्थळी प्रत्यक्ष जाऊन अभिवादन करण्याची तीव्र इच्छा होती. त्यानुसार मी सकाळी साडेसहा वाजता बारामती येथे पोहोचलो.
यावेळी स्मृतीस्थळी सुनेत्राताई पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांचे दर्शन घेण्याचा योग आल्याचे त्यांनी सांगितले. स्व. अजितदादा पवार यांच्या विचारांची प्रेरणा आणि त्यांनी दिलेली ऊर्जा घेऊन आपण परतल्याचेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा – पुनावळेतील SIR मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मतदार यादी अद्ययावतीकरणासाठी नागरिकांची मोठी गर्दी
दरम्यान, बारामतीहून परत येताना वाटेत पावसामुळे झालेला विलंब आणि वेळेचे नियोजन न जुळल्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहणे शक्य झाले नाही. याबद्दल त्यांनी खेद व्यक्त करत संबंधितांची क्षमा मागितली आहे.
महापालिकेतील कार्यक्रमास अनुपस्थित राहण्यामागे कोणतेही अन्य कारण नसून, स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी आपण बारामती येथे गेलो होतो, असे स्पष्ट करत भाऊसाहेब भोईर यांनी आपला खुलासा मान्य करून तो प्रसिद्ध करावा, अशी विनंती केली आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“स्व. अजितदादा पवार हे माझ्यासाठी केवळ एक नेते नव्हते, तर ते माझ्या राजकीय आयुष्याचे प्रेरणास्थान होते. त्यांच्यासोबतचा प्रत्येक क्षण हा अमूल्य ठेवा आहे. कार्यकर्त्यांना कुटुंबाप्रमाणे जपण्याची त्यांची प्रेमळ वृत्ती, विकासासाठीची त्यांची अविरत धडपड आणि कामातील शिस्त हीच आमच्या पुढील वाटचालीची ऊर्जा आहे. ते आज शारीरिकरित्या आपल्यात नसले, तरी त्यांचे विचार, त्यांचे संस्कार आणि महाराष्ट्राच्या विकासाचे त्यांचे स्वप्न आम्हाला सदैव प्रेरणा देत राहील. स्व. अजितदादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत, त्यांनी दाखविलेल्या विकासाच्या मार्गावर निष्ठेने वाटचाल करण्याचा संकल्प आम्ही आज पुन्हा दृढ केला आहे.”
– भाऊसाहेब सोपानराव भोईर, विरोधी पक्षनेते, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका





