Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्द

मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई | मराठी भाषेला अभिजात भाषेचा मान मिळाल्याबाबतची अधिसूचना आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द केली असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, अभिजात भाषा पाठपुरावा समितीचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवळ व राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे उपस्थित होते.

मराठी भाषेला मान मिळाल्याचा अभिमान

मंत्री उदय सामंत यांनी या ऐतिहासिक प्रसंगी आनंद व्यक्त करत पत्रकारांना सांगितले की, ११ वर्षांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवला होता. तेव्हा ते मराठी भाषेचे राज्यमंत्री होते. याबाबतची अधिसूचना आज स्वीकारताना त्याच विभागाचा मंत्री आहे, हा मोठा योगायोग आहे. महाराष्ट्राच्या प्राकृत भाषेला हा मान मिळाल्याचा अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा    –      तिरुपती मंदिर परिसरात चेंगराचेंगरी, ६ जणांचा मृत्यू तर ३० जण जखमी

प्रधानमंत्री मोदींचे महाराष्ट्राच्या जनतेकडून आभार

महाराष्ट्राच्या जनतेच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानत, मंत्री उदय सामंत यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.

मराठी भाषेच्या विकासासाठी निधीची मागणी

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याशी झालेल्या भेटीमध्ये मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्राच्या प्राकृत भाषेला निधीची अधिक उपलब्धता करून देण्याची विनंती केली. तसेच पुण्यात होणाऱ्या आगामी विश्व मराठी संमेलनाला केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी येण्याचे मान्य केले असल्याची माहितीही त्यांनी दिली. दिल्लीच्या साहित्य संमेलनाच्या पाठीशी राज्य शासन उभे असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

पुढील महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजात भाषेचा दर्जा हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. मागील वर्षीपासून साहित्य संमेलनासाठी राज्य शासनाने दोन कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून यावर्षीही तेवढीच मदत दिली जाईल, असे मंत्री उदय सामंत म्हणाले. दिल्लीतील मराठी शाळा सुदृढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकार विशेष प्रयत्न करेल, असे मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button