“जागतिक तणावाच्या काळात भारत जगासाठी दीपस्तंभ बनू शकतो”, पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मुंबईत ‘इंडिया मेरीटाइम वीक-२०२५’ दरम्यान आयोजित मेरीटाइम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये भाषण केले. यामध्ये ते म्हणाले की, जागतिक तणाव, व्यापारातील अडथळे आणि बदलत्या पुरवठा साखळ्यांमध्ये भारत जगासाठी दीपस्तंभ बनू शकतो. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचाही उल्लेख केला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी…
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. त्यांनी केवळ सागरी सुरक्षेचा पाया घातला नाही, तर अरबी समुद्रातील व्यापारी मार्गांवर भारताचे वर्चस्व अभिमानाने प्रस्थापित केले. जेव्हा जागतिक समुद्र अशांत असतात, तेव्हा जग एका स्थिर दीपस्तंभाचा शोध घेते आणि भारत तो दीपस्तंभ बनू शकतो. भारत हा धोरणात्मक स्वायत्तता, शांतता आणि समावेशक विकासाचे प्रतीक आहे. भारताची लोकशाही व्यवस्था आणि विश्वासार्हता त्याला अद्वितीय बनवते.”
भारताची बंदरे आता…
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “भारताचे सागरी क्षेत्र वेगाने प्रगती करत आहे आणि भारताची बंदरे आता विकसनशील देशांमध्ये सर्वात कार्यक्षम मानली जातात. पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, आधुनिक कायद्यांनी वसाहतवादी काळातील जुन्या शिपिंग कायद्यांची जागा घेतली आहे. मेरीटाइम इंडिया व्हिजन अंतर्गत १५० हून अधिक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत, ज्यामुळे बंदरांची क्षमता दुप्पट झाली आहे आणि मालवाहतूक ७००% वाढली आहे. देशातील सक्रिय जलमार्गांची संख्या तीनवरून ३२ पर्यंत वाढली आहे.”
हेही वाचा – “शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत सरकार पहिल्या दिवसापासून सकारात्मक भूमिकेत…”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पंतप्रधानांचा परदेशी प्रतिनिधींशी संवाद
तत्पूर्वी, मोदींनी या कॉन्क्लेव्हला आलेल्या परदेशी प्रतिनिधींशीही संवाद साधला. हे कॉन्क्लेव्ह भारताच्या सागरी सीमेचे प्रदर्शन आहे आणि या कॉन्क्लेव्हमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सागरी सीमेचे संरक्षण आणि सुरक्षितता यावर चर्चा होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. ते म्हणाले की, “पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची सागरी शक्ती स्वातंत्र्यानंतरच्या सर्वोच्च पातळीवर विकसित होत आहे. भारत सागरी क्षेत्रात एक नवीन शक्ती म्हणून उदयास येत आहे. या पाच दिवसांच्या कार्यक्रमात आतापर्यंत ५५,००० कोटींचे करार झाले आहेत. यामुळे देशाला या क्षेत्रात प्रगतीची नवीन उंची गाठण्याची संधी मिळेल.”




