मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा; यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई | भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात येत्या काही दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईत विशेषतः दादर, सायन, कुर्ला, चेंबूर, अंधेरी आणि मालाड या भागांमध्ये जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे, तर नवी मुंबईतील वाशी, नेरुळ, कोपरखैरणे आणि घनसोली या भागांमध्येही पावसाचा जोर अधिक असेल. संध्याकाळनंतर पावसाचा वेग वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सखल भागात पाणी साचण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
हेही वाचा : आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर शहरात दहा दिवस मांस विक्रीला बंदी
दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळी वारे (४०-५० किमी/तास) वाहण्याची शक्यता आहे. या भागात दरड कोसळण्याचा धोका असल्याने स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि समुद्रकिनारी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.