पुढील एकदिवसीय विश्वचषकात विराट, रोहितचा सहभाग अवघड; सौरभ गांगुलीचं मोठं वक्तव्य

Sourav Ganguly | भारताचे माजी कर्णधार सौरभ गांगुली यांनी २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या सहभागाबाबत शंका व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱ्या या स्पर्धेपर्यंत कोहली ३८ आणि रोहित ४० वर्षांचे असतील. गांगुली यांच्या मते, या वयात तंदुरुस्ती राखणे आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणे हे दोघांसाठी मोठे आव्हान असेल.
सौरभ गांगुली म्हणाले, की पुढील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांत होणार आहे. तेव्हा कोहली ३८, तर रोहित ४० वर्षांचा होईल. तोपर्यंत भारताला द्विपक्षीय मालिकांमध्ये २७ एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. म्हणजेच दोघांना वर्षाला १५ आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत आणि ते सोपे नसेल.
हेही वाचा : मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा; यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी
कोहली आणि रोहित य दोघांनी एकदिवसीय क्रिकेटला प्राधान्य दिले असले, तरी त्यांच्यासाठी तंदुरुस्ती महत्त्वाची राहणार आहे. प्रत्येक खेळाडूच्या कारकीर्दीत एक वेळ अशी येते जेव्हा खेळ त्यांच्यापासून दूर जातो. तुमच्या हालचाली संथ होतात. ही वेळ कधी येईल हे सांगणे अवघड आहे. माझ्या सल्ल्याची या दोघांना गरज नाही. दोघेही खूप क्रिकेट खेळले आहेत. ते योग्य निर्णय घेतील, असं सौरभ गांगुली म्हणाले.
कोहलीच्या दर्जाचा खेळाडू शोधणे सोपे नाही. मात्र, एक नक्की की कोहलीच काय तर रोहितच्या निवृत्तीनंतरही मला भारतीय क्रिकेटच्या भविष्याची चिंता नाही. भारतीय क्रिकेटमध्ये गुणवत्तेची कमतरता नाही, असं सौरभ गांगुली म्हणाले.
झटपट क्रिकेटमध्ये युवराजची वेगळी छाप होती. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अशा तीनही आघाड्यांवर त्याची पकड होती. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये त्याला फारशी संधी मिळाली नाही. युवराज ३० कसोटी सामने खेळला, पण तो राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, मी स्वत: आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्यापुढे झाकोळला गेला, असंही सौरभ गांगुली म्हणाले.