हगवणे कुटुंबीयांचा नवा कारनामा उघड: चित्रपट दिग्दर्शकाला धमकी, लाखो रुपयांची फसवणूक
'खुर्ची' या मराठी चित्रपटाच्या निर्मितीमध्ये गुंतलेला पैसा, दिग्दर्शकाला पिस्तूल दाखवून धमकी

पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर हगवणे कुटुंबीयांचे अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत. सध्या कोठडीत असलेल्या राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर नवनवीन आरोप समोर येत असून आता त्यांचा पुतण्या संतोष हगवणे याच्या चित्रपट प्रकल्पाशी संबंधित फसवणुकीचाही पर्दाफाश झाला आहे.
संतोष हगवणे यांनी निर्मिती केलेल्या ‘खुर्ची’ या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील यांनी आरोप केला आहे की, हगवणे कुटुंबीयांनी लाखो रुपये थकवले आणि चित्रपटात स्वतःची गाडी वापरून आर्थिक फसवणूक केली. एवढ्यावरच न थांबता, पाटील यांना पिस्तूल दाखवून धमकावल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात आला आहे.
चित्रपटाचे पोस्टर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लाँच करण्यात आले होते. विशेष म्हणजे, शशांक हगवणे आणि वैष्णवीच्या लग्नातही फॉर्च्युनर कारची चावी अजित पवारांच्या हस्ते देण्यात आली होती. त्यामुळे हगवणे कुटुंब आणि राजकीय साखळ्या यामध्ये असलेला संबंध अधोरेखित होत आहे.
दिग्दर्शक अविनाश पाटील यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार केली असतानाही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. याशिवाय, जालिंदर सुपेकर या हगवणे कुटुंबीयांच्या नातेवाईकाची नावंही वारंवार समोर येत असून त्यांच्या दबावाखाली शस्त्र परवाने मिळाल्याचा आरोप आहे.
दरम्यान, जालिंदर सुपेकर यांची बदली करून त्यांची पदावनती करण्यात आली असून ते आता उप महासमादेशक होमगार्ड या पदावर नियुक्त झाले आहेत.