आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना १ लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकार पुन्हा एकदा लाडक्या बहिणांना मोठ गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली ‘लाडकी बहीण योजना’ सध्या अटी आणि शर्तींच्या कचाट्यात अडकली आहे. अशातच, लाडक्या बहिणींना खूश करण्यासाठी भाजपकडून नवी रणनीती आखण्यात आली आहे.
लाडक्या बहिणींना मुंबई बँक मदतीचा हात देणार असून लाडक्या बहिणींना आता शून्य टक्के व्याज दराने कर्जपुरवठा केला जाणार आहे. लाडक्या बहिणींचे पैसे उद्योग-व्यवसायांच्या माध्यमातून बाजारात आले पाहिजे, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. त्यामुळे, आता लाडक्या बहिणींना ९ टक्के व्याजदराने देण्यात येणारा कर्जपुरवठा चक्क शून्य टक्के व्याजदराने मिळणार आहे, असे मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितले. शासनाच्या ४ महामडंळातील विविध योजनांमधून ही सवलत देण्यात आली आहे.
या चार महामंडळांमध्ये अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटक्या-विमुक्तांसाठीचं महामंडळ, ओबीसी महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचा समावेश आहे. या योजनांमधून महिलांना 12 टक्क्यांपर्यंत व्याज परत मिळतं, त्यामुळे प्रत्यक्षात महिलांसाठी कर्ज मोफत ठरते.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच! SNDT महिला विद्यापीठ अंतर्गत B. Sc. IT अभ्यासक्रमाची सुविधा!
सध्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 12 ते 13 लाख महिला आहेत. त्यातील अनेक महिला आता शून्य टक्के व्याजदराचा फायदा घेऊ शकतील. मुंबई बँकेच्या अंदाजानुसार, त्यांच्या बँकेकडे सुमारे 1 लाख महिला सभासद आहेत आणि त्याही या नव्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
एका महिलेला 1 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं, त्यात 5 ते 10 महिला एकत्र येऊन व्यवसाय करू शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चारही महामंडळाचे संचालक व संबंधित खात्याचे सचिव आणि अतिरिक्त सचिव होते, ज्यांसमवेत झालेल्या बैठकीतून या चारही महामंडळाच्या माध्यमातून महिलांना शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्याचा शासन निर्णय झाला आहे, मुख्यमंत्र्यांनी तसे आदेशही दिले आहेत, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.