Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात २०२६ पर्यंत दिवसा १२ तास सोलरची मोफत वीज… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

नागपूर : राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात २०२६ पर्यंत दिवसा १२ तास सोलरची मोफत वीज पोहोचवण्याचे काम शासन करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीतर्फे डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त अमरावती येथे आयोजित समारंभात मुख्यमंत्री फडणवीस यांना ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

या वेळी फडणवीस म्हणाले की, शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व यांत्रिकीकरणाचा वापर वाढवला जात असून त्यामुळे शेती फायदेशीर ठरणे शक्य आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हवामानातील बदलांचा परिणाम कमी करता येऊ शकतो. पुणे येथे झालेल्या एका कृषी कार्यक्रमात विविध कृषीआधारित स्टार्टअप पाहण्याची संधी मिळाली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने हवामानाचा अभ्यास करून पिकांवर कोणती किड येऊ शकते, यासह अन्य माहिती शेतकऱ्यांना मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, शासनाने अवघ्या एका महिन्यात सर्वाधिक सौर कृषी पंप बसवण्याचा जागतिक विक्रम केला आहे. येत्या २०२६ पर्यंत राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा १२ तास मोफत सौर वीज देण्याचा निर्णय शासनाने निश्चित केला आहे. त्यामुळे कोरडवाहू शेती बागायतीत रूपांतरित करण्याचा ‘मिशन’ शासन राबवत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा –  रब्बी हंगामासाठी तातडीने आवर्तन सोडण्यास मान्यता; जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना मंत्री विखे पाटलांच्या सूचना

नदीजोड प्रकल्पांतर्गत ५०० किलोमीटर नवीन नदी प्रवाह तयार करून पश्चिम महाराष्ट्रातील खारपान पट्ट्यासह दुष्काळग्रस्त भागात सिंचन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, स्मार्ट आणि मॅग्नेट योजनांद्वारे हजारो कोटी रुपये खर्च करून शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

देशात सर्वांना अन्न देण्याची मुहूर्तमेढ डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी रोवली. कृषी तंत्रज्ञानाचा विकास व्हावा, सक्षम कृषी अभ्यासक्रम तयार व्हावा, शेतीसाठी कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे आणि देशभर सशक्त कृषी विद्यापीठे उभी राहावीत, यासाठी त्यांनी कार्य केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान निर्मितीच्या कार्यातही भाऊसाहेब देशमुख यांनी सहकार्य केले. देशातील शेतकऱ्यांना सावकारी कर्जातून मुक्त करण्यासाठी पहिला सावकारीविरोधी कायदा करणारे ते अग्रणी होते. चुकीच्या रूढी-परंपरांना आव्हान देत ते नेहमीच त्याविरोधात ठामपणे उभे राहत असत.

अमरावती येथील अंबादेवी मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश नव्हता. त्या वेळी त्यांनी आंदोलन करून अस्पृश्यांना मंदिरप्रवेश मिळवून दिला, असेही फडणवीस यांनी सांगितले

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button