एक्झर्बिया अॅबोड संकुलात दहीहंडीचा उत्साही जल्लोष
बालगोपाल-गोपिकांचा उत्साही सहभाग, नृत्यस्पर्धा व दहीहंडी फोडीतून सणाला अधिक रंगत
वडगाव मावळ :
“भक्ती, उत्साह आणि प्रेम यांचा गोड संगम म्हणजे गोपाळकाला; दहीहंडी म्हणजे चैतन्य, आनंद आणि एकोप्याचा सण!” या भावनेतून एक्झर्बिया अॅबोड जांभुळगाव रहिवाशी संकुलात दहीहंडी उत्सव यंदा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
एक्झर्बिया अॅबोड गणेशोत्सव मंडळ 2025 यांच्या वतीने शनिवार दि. 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मंडळाचे अध्यक्ष अनंत भानुदास गुळवे व त्यांची सुविद्य पत्नी वर्षा गुळवे यांच्या हस्ते दहीहंडी पूजनाने करण्यात आली. यानंतर गोविंदा पथकाने उत्साह, शिस्त आणि एकोप्याचे दर्शन घडवत थरावर थर रचून दहीहंडी फोडली. या माध्यमातून सामाजिक एकता, सौहार्द आणि बांधिलकीचा अनोखा संदेश देण्यात आला. लहानग्यांना कोणत्याही प्रकारची इजा न होता पार पडलेला हा उत्सव यशस्वी करण्यात मंडळाचे पदाधिकारी यशस्वी ठरले. अखेरीस भक्ती, उत्साह आणि सौहार्दाच्या वातावरणात पार पडलेला हा उत्सव संकुलाच्या एकतेचे व संस्कृतीप्रेमाचे द्योतक ठरला.
“गोविंदा आला रे आला, गोविंदा रे गोपाळा, जरा मटकी संभाल बृजबाला” या जयघोषांनी संकुलाचा प्रत्येक कोपरा दुमदुमून गेला. रहिवाशी, बालगोपाल व गोपिकांच्या उत्साही सहभागामुळे कार्यक्रमाला अधिकच रंगत आली.
हेही वाचा : जयगड सोसायटीमध्ये स्वखर्चाने ३० किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वयीत!
दरम्यान, लहानग्यांसाठी ओपन टू ऑल फ्री-स्टाईल नृत्य स्पर्धा घेण्यात आली. मुलांच्या गटात विहान विजय भोरे (मोठा गट – प्रथम), विराज विकास भोईटे (लहान गट – द्वितीय) तर मुलींच्या गटात विणा भोरे (मोठा गट – प्रथम), ऋदवी दिनेश सकट (लहान गट – द्वितीय) यांनी पारितोषिके पटकावली. तर दहीहंडी फोडण्याचा मान प्रणित प्रकाश कांबळे याने मिळवला असून मंडळाच्यावतीने त्याला विशेष बक्षीस देण्यात आले. तर आरोही पुरी या चिमुकलीनेदेखील आपल्या कलागुणांचे प्रदर्शन घडवित उपस्थितांची मने जिंकली. त्या बद्दल तिचा महाराष्ट्र गॅरेज लोणावळा यांच्याकडून विशेष बक्षिस देऊन गौरव करण्यात आला.
या वर्षी प्रथमच संकुलात इतक्या मोठ्या उत्साहात आणि बिगर-राजकीय वातावरणात हा उत्सव पार पडल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. “लहानग्यांच्या उत्साही सहभागामुळे कार्यक्रम अधिक यशस्वी व संस्मरणीय ठरला” अशा भावना अध्यक्ष अनंत भानुदास गुळवे, उपाध्यक्ष सोमेश्वर रंगनाथ काळे, पंढरीनाथ हिंगे व धनंजय चंद्रकांत वाणी यांनी व्यक्त केल्या.
लहानग्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून संकुलातील दानशूर मंडळींनी उत्स्फूर्तपणे देणगी देत प्रयोजकत्व स्वीकारले. यामध्ये हर्षल गणपतराव शिरसुलवार, महाराष्ट्र गॅरेज लोणावळा, अनंत गुळवे, ओमराजे हिंगे, शुधांशू अनेच्छा, सोमेश्वर काळे यांचे विशेष योगदान लाभले.





