शिर्डी : साईचरणी सोन्याचे ताट, चांदीचे अगरबत्ती स्टँड, त्रिशूल; सलग सुट्ट्यांनी शिर्डीत भाविकांचा ओघ
हैद्राबाद येथील भक्ताकडून एकूण किंमत 17 लाख 73 हजार 834 रुपये इतकी देणगी
अहिल्यानगर: स्वातंत्र्य दिन, गोकुळाष्टमी आणि रविवार अशी सलग सुट्टी आल्याने शिर्डी नगरी साईभक्तांनी फुलून गेली आहे. देशभरातून तसेच परदेशातून आलेल्या भाविकांनी साईसमाधीला हजेरी लावत भक्तिभावाने विविध मूल्यवान वस्तूंची देणगी अर्पण केली.
हैद्राबाद (तेलंगणा) येथील साईभक्त डॉ. जी. हरीनाथ आणि श्रीमती जी. पुष्पलता यांनी श्री साईचरणी 191.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ताट आणि 283 ग्रॅम वजनाचा चांदीचा अगरबत्ती स्टँड अर्पण केला. या दोन्ही वस्तूंची एकूण किंमत 17 लाख 73 हजार 834 रुपये इतकी आहे.
याचबरोबर शिर्डी संस्थानचे माजी संरक्षण अधिकारी आण्णासाहेब बन्सी परदेशी यांनी त्यांच्या मुलगा व मुलीला शासकीय सेवेत नोकरी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत साईबाबांच्या चरणी 36.200 ग्रॅम वजनाचा, 3 लाख 31 हजार रुपये किमतीचा सोन्याचा त्रिशूल अर्पण केला.
या सर्व देणग्यांनंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार भाविकांचा सन्मानपूर्वक सत्कार केला. साईबाबांवरील श्रद्धा आणि भक्तीमुळे देश-विदेशातील भक्त मोठ्या प्रमाणावर विविध स्वरूपातील देणग्या अर्पण करत असतात, हे या प्रसंगावरून अधोरेखित झाले.
दरम्यान, स्वातंत्र्य दिनानिमित्त शिर्डीमध्ये विविध देशभक्तिपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय कार्यालये आणि शाळांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
गोकुळाष्टमीच्या दिवशी हजारो भाविकांनी शिर्डीतील दहीहंडी उत्सवाचा आनंद घेतला. रात्री साईबाबा समाधी मंदिरात हभप स्मिता आजेगावकर यांचे श्रीकृष्ण जन्म कीर्तन पार पडले. त्यानंतर श्रींची शेजारतीही संपन्न झाली.
शिर्डी मध्ये सण-उत्सव
शनिवारी सकाळी समाधी शताब्दी मंडपावर स्मिता आजेगावकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. कीर्तनानंतर श्री साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील कोते यांच्या वंशज परीवारातील पारेश्वर बाबासाहेब कोते यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. रात्री श्रींच्या रथाची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली. शिर्डी मध्ये सण-उत्सव आणि सलग सुट्ट्यांमुळे वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले असून, साईभक्तांचा ओघ अजूनही सुरूच आहे.





