‘बीड प्रकरणाला जातीय वळण देऊ नका, सर्व आरोपी वेगवेगळ्या समाजाचे’; SP नवनीत काँवत यांचे आवाहन

बीड : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच आता बीडमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेला. या घटनेचा भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भारताने ज्या प्रकारे पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर सीमेवर केले होते. तसेच महाराष्ट्राच्या बीडमध्ये देखील केले पाहिजे, अशी मागणी केली आहे. त्यानंतर आता बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी परळी तालुक्यातील टोकवाडी परिसरात झालेल्या या मारहाणीला जातीय रंग न देण्याचे आवाहन केलं आहे. हे सर्व आरोपी वेगवेगळ्या समाजाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा – यंदा समुद्राला पावसाळ्यात १८ दिवस मोठी भरती… २६, २७ जून जुलैला सर्वात मोठी उधाणं
नवनीत काँवत म्हणाले, परळी तालुक्यातील टोकवाडी परिसरात झालेली मारहाण ही तत्कालिक कारणातून झाली आहे. या प्रकरणाला कुठलाही जातीय रंग देण्याचा प्रयत्न कोणीही करू नये.असे आवाहन बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी केले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वेगवेगळ्या समाजाचे मुलं आहेत . हे प्रकरण तात्कालीन असून यामागे जातीय कारण नसल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं . हे प्रकरण गंभीर आहे .आरोपींवर कठोर व गंभीर गुन्ह्यांची नोंद आम्ही केली आहे .यात सखोल तपास होईल असे आश्वासनही पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिले आहे.