‘मी गृहमंत्री अमित शाह यांना बोलू का’? ईडीच्या अटकेआधी एकनाथ शिंदेचा मला फोन, राऊतांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे आज सायंकाळी ६ वाजता प्रकाशन सोहळा प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरमध्ये पार पडणार आहे. हे पुस्तक प्रकाशित होण्याआधीच संजय राऊत यांची संबंध देशात चर्चा सुरू आहे.
कारण राऊतांनी या पुस्तकातून अनेक मोठे गौप्यस्फोट केले आहेत. पत्राचाळ प्रकरणात ईडीने संजय राऊत यांना अटक केली होती. यानंतर त्यांना १०० दिवसांचा तुरुंगवास भोगवा लागला होता. याचे अनुभव त्यांनी या पुस्तकात मांडले आहेत. तसेच अनेक राजकीय खळबळजनक दावे देखील त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहेत.
या पुस्तकात शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंनी संकटकाळी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कशाप्रकारे मदत केली. याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे आता भाजपसह महायुतीमधील नेत्यांकडून या पुस्तकावर टीका केली जात आहे.
याच टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. ईडीकडून अटक होण्याआधी एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला होता. मी वरती बोलू का?, गृहमंत्री अमित शाह यांना बोलू का?, असं एकनाथ शिंदे मला फोन करुन म्हणाले, असं संजय राऊत यांनी सांगितले.
हेही वाचा – ‘बीड प्रकरणाला जातीय वळण देऊ नका, सर्व आरोपी वेगवेगळ्या समाजाचे’; SP नवनीत काँवत यांचे आवाहन
संजय राऊत म्हणाले, ईडीकडून अटक होण्याआधी एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला होता. मी वरती बोलू का?, गृहमंत्री अमित शाह यांना बोलू का?, असं एकनाथ शिंदे मला फोन करुन म्हणाले होते. यावर काहीच गरज नाही. तुम्ही माझ्याबद्दल वरती बोललात तरी मी तुमच्या पक्षात येणार नाही, असं संजय राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाले, असा गौप्यस्फोट राऊतांनी केला आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, मला अटक करण्याआधी मी शहा यांना फोन केला होता, कारण ते गृहमंत्री होते. रात्री अकरा वाजता अमित शाह यांना कॉल केला होता ते कामात होते. 4-5 मिनिटांनी त्यांचा कॉल आला. अटकेआधी माझ्या निकटवर्तीयांना त्रास दिला जात होता, धमक्या दिल्या, असं त्यांना सांगितले.
तसेच, मी त्यांना म्हणालो माझ्या मित्रावर रेड पडत आहे. हे तुमच्या मंजुरीने होतं आहे. जर मला अटक करायची आहे तर मी दिल्लीच्या घरी आहे ही नौटंकी बंद करा, असं मी अमित शाह यांना म्हणालो. यावर मला काहीच माहिती नाही, असं अमित शाह म्हणाले होते. माझ्या कुटुंबाला त्रास का दिला जातोय?, असा सवाल संजय राऊतांनी अमित शाह यांना केल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.