‘तिने भावाला प्रपोज केलेलं..’; आरोपीच्या बहिणीची माहिती, फलटण डॉक्टर प्रकरणाला नवं वळण

Satara Doctor Death Case | सातारा जिल्ह्यातील फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली असून राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तरुण डॉक्टरने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून जीवन संपवलं असून, त्यामध्ये तिने पीएसआय गोपाल बदाने आणि प्रशांत बनकर या दोघांवर गंभीर आरोप केले आहेत.
या प्रकरणी आज पहाटे सातारा पोलिसांनी आरोपी प्रशांत बनकरला अटक केली आहे. दरम्यान, आरोपी प्रशांत बनकरच्या कुटुंबीयांनी मात्र महिला डॉक्टरवरच गंभीर आरोप केले आहेत. “महिला डॉक्टर माझ्या भावाला टॉर्चर करत होती, ब्लॅकमेल करत होती, आणि तिनेच १५ दिवसांपूर्वी माझ्या भावाला प्रपोज केलं होतं”, असा दावा प्रशांतच्या बहिणीने केला आहे.
हेही वाचा : महावितरण पुनर्रचना ग्राहक व कर्मचारी हिताची
मयत डॉक्टर आम्हाला फॅमिली मेंबरसारख्या होत्या. आम्हाला बहिणीसारख्या होत्या. त्या नेहमी घरी यायच्या. आमच्याशी बोलायच्या. जॉबवर सुरू असलेल्या त्रासाबद्दल सांगायच्या. यातून त्यांना मानसिक त्रास सुरू असल्याचं दिसून यायचं. माझ्या भावाची आणि डॉक्टरची याच महिन्यात ओळख झाली होती. तिने १५ दिवसांपूर्वी भावाला प्रपोज केलं होतं. त्या माझ्या भावाला दादाही म्हणत होती. त्यामुळे माझ्या भावाने तिला समजावून सांगितलं होतं. त्यानंतर तो विषय तिथेच क्लोज झाला होता. दोघंही संपर्कात नव्हते, असं आरोपी प्रशांतची बहीण म्हणाली.
लक्ष्मीपूजनच्या दिवशी आम्ही एकत्र सण साजरा केला. यावेळी माझ्या भावाने डॉक्टरचे काही फोटो काढले होते. फोटो व्यवस्थित न आल्याने दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता. माझा भाऊ डॉक्टरवर ओरडला होता. पण त्यानंतर तो सॉरी बोलला होता. दरम्यान, माझ्या भावाचा मित्र आजारी असल्याने तो मित्राच्या घरी गेला होता. तेव्हा डॉक्टरने माझ्या भावाला कॉल वर कॉल केले. अनेकदा कॉल करून टॉर्चर केलं. तुम्हाला माझी काळजी नाही, असं म्हणत ती ब्लॅकमेल करत होती, असंही प्रशांत बनकरच्या बहिणीने म्हटलं आहे.





