पेट्रोल-डिझेलचा वापर जपून करावा; पंतप्रधान मोदींचे देशवासियांना आवाहन
पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करु नका : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Narendra Modi | पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि अमेरिका-इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला आहे. आजच्या काळाची गरज ओळखून पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर अत्यंत संयमाने करा, असे आवाहन त्यांनी रविवारी केले. हैदराबाद येथे ९,४०० कोटी रुपयांच्या विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते ऊर्जा सुरक्षेवर भाष्य करत होते.
‘होर्मुझची सामुद्रधुनी’ बंद झाल्याचा मोठा फटका
सध्या जागतिक बाजारपेठेत तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग समजली जाणारी ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ युद्धामुळे बंद झाली आहे. यामुळे भारतासारख्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशांसमोर मोठे आर्थिक आव्हान उभे राहिले असून, परकीय चलनाचा साठा वाचवणे हे सरकारपुढील मुख्य उद्दिष्ट बनले आहे.
बचतीसाठी पंतप्रधानांचा ‘हा’ कानमंत्र
पंतप्रधानांनी इंधन बचतीसोबतच अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय सुचवले आहेत. नागरिकांनी शक्य तिथे मेट्रोचा वापर करावा आणि खाजगी गाड्यांऐवजी कारपूलिंगवर भर द्यावा, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच मालवाहतुकीसाठी रेल्वेचा वापर वाढवल्यास डिझेलवरील अवलंबित्व कमी होईल, असेही त्यांनी नमूद केले. यासोबतच नागरिकांनी किमान एक वर्षासाठी आपला परदेश प्रवास पुढे ढलावा आणि सणासुदीच्या काळात सोने खरेदी टाळावी, असे विशेष आवाहन मोदींनी केले आहे.
हेही वाचा
सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाचं संकट, महाराष्ट्रातील या भागासह अनेक राज्यांना अलर्ट जारी
आपल्याला आयात केलेल्या पेट्रोलियम उत्पादनांचा वापर केवळ आवश्यक असेल तेव्हाच करायचा आहे. यामुळे केवळ परकीय चलन वाचणार नाही, तर युद्धाचा आपल्या अर्थव्यवस्थेवर होणारा विपरीत परिणामही कमी होईल. पेट्रोलियम उत्पादनांसोबतच नागरिकांनी दररोजच्या स्वयंपाकाच्या तेलाचा वापर १० टक्क्यांनी कमी करावा, ज्यामुळे देशाच्या आर्थिक स्थितीला मदत होईल आणि कुटुंबाचे आरोग्यही सुधारेल.
आत्मनिर्भरतेवर भर
देशातील ऊर्जा अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकार सौर ऊर्जा, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण आणि सीएनजी जाळ्याचा विस्तार करत असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी आपल्या रोजच्या वापरातील परदेशी वस्तूंची यादी करून शक्य तितक्या लवकर ‘आत्मनिर्भर’ बनण्याच्या दिशेने पावले उचलावीत, असे सांगत पंतप्रधानांनी स्वदेशीचा मंत्र पुन्हा एकदा अधोरेखित केला. या आवाहनामुळे आगामी काळात देशात इंधन बचतीसाठी मोठी लोकचळवळ उभी राहण्याची चिन्हे आहेत.





