‘डिजिटल मीडिया’ला मिळाली अखेर राजमान्यता : राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
मुख्यमंत्री फडणवीस यांची सकारात्मक भूमिका: डिजिटल माध्यम शासकीय जाहीरात मार्गदर्शक सूचना जाहीर

मुंबई : Digital Media Maharashtra News | राज्य शासनाने आज महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया मधील काम करणाऱ्या संपादक पत्रकारांसाठी मोठा क्रांतिकारक निर्णय घेतला असून डिजिटल मीडिया मधील चॅनल्स व वेब पोर्टल्स ना आता राजमान्यता देऊन त्यांना जाहिरात देण्याबाबतचे परिपत्रक दि. 3 जून रोजी अधिकृतरित्या जाहीर केले आहे.
महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंत तसेच ग्रामीण भागापासून मेट्रो सिटी पर्यंत विस्तृत जाळे असलेल्या डिजिटल मीडिया मधील संपादक पत्रकारांना याचा लाभ होणार आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या भिलार महाबळेश्वर व कनेरी मठ कोल्हापूर येथे झालेल्या महा अधिवेशनादरम्यान सुद्धा तात्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी याबाबत संघटनेला आश्वासन दिले होते.
दरम्यान महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक पत्रकारांना याचा लाभ होणार असून संघटनेने केलेल्या योग्य पाठपुरावामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या इतिहासात हा आजचा निर्णय म्हणजे क्रांतिकारक निर्णय आहे.
या निर्णयाचा थेट फायदा महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि उपनगरांमध्ये कार्यरत असलेल्या हजारो डिजिटल मीडियातील संपादक व पत्रकारांना होणार आहे. हे माध्यम राज्यातील कोट्यवधी लोकांपर्यंत बातम्या पोहोचवतात, मात्र अद्यापपर्यंत त्यांना राजकीय किंवा शासकीय पातळीवर मान्यता नव्हती. जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकामुळे डिजिटल मीडियाचे महत्त्व अधोरेखित झाले असून या क्षेत्राला मुख्य प्रवाहात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.