धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ? कृषी विभागाची २०० कोटींची रक्कम परस्पर उचलल्याचा आरोप

मुंबई : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सातत्याने होत असलेल्या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र राजीनामा दिल्यानंतरही धनंजय मुंडे यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. आता कृषिमंत्री असताना झालेल्या एका घोटाळ्याची चौकशी सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या मागे आता ईडी चौकशीचा फेरा लागण्याची शक्यता आहे.
धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात कृषी विभागात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तब्बल २०० कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. भाजप आमदार सुरेश धस कृषी विभागातील या घोटाळ्याची ईडीकडे पत्र लिहून तक्रार करणार आहेत. तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी कृषी विभागाची २०० कोटींची रक्कम परस्पर उचलल्याचा दावा धस यांनी केला आहे.
हेही वाचा – ‘मी चुकलो, मला एक संधी द्या’; रस्त्यावरच लघुशंका करत अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाने मागितली माफी
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीदेखील धनंजय मुंडे यांच्यावर कृषीमंत्री असताना जवळपास २४५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बळकटी देण्यासाठी सरकारने योजना सुरू केली होती. या योजनेतील नियम धाब्यावर बसवून मुंडे यांनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. या योजनेअंतर्गत कापूस गोळा करण्याच्या बॅग, नॅनो युरिया, नॅनो डीओबी, फवारणी पंप अशा वस्तूंची खरेदी करण्यात आली. मात्र या वस्तूंची खरेदी बाजारभावापेक्षा महाग करण्यात आली. यामुळे कमी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आहे.
वाल्मीक कराड याने धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयामधूनच आवादा कंपनीला खंडणी मागितल्याची माहिती समोर आली आहे. आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबातून ही स्पष्ट करण्यात आले आहे. ८ ऑक्टोबर रोजी वाल्मीक कराडने जगमित्र कार्यालयामधून आवादा कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याचे यामध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांनाही सहआरोपी करा, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या कार्यालयामधूनच खंडणीची मागणी झाल्याचे समोर आल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. धनंजय मुंडे यांनाही संतोष देशमुखांच्या हत्येत सहआरोपी करा, अशी होत आहे. पहिल्यापासून धनंजय मुंडे हे या प्रकरणात आरोपी आहेत, असे आम्ही म्हणत आहोत. जगमित्र कार्यालयासह मुंडेंच्या सातपुडा या बंगल्यावरही खंडणीची बैठक झाल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे. त्यामुळे त्यांना सहआरोपी करायला पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.