लाचखोर पीएसआय प्रमोद चिंतामणीच्या घरी ५१ लाखांची रोकड जप्त; २ कोटींच्या लाचप्रकरणात नवे धक्कादायक तपशील

पुणे | पुण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत पोलीस उपनिरीक्षक (PSI) प्रमोद चिंतामणी यांच्या भोसरी येथील घरातून तब्बल ५१ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. रविवारीच प्रमोद चिंतामणी यांना ४६ लाख ५० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते.
एका दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी PSI प्रमोद चिंतामणी यांनी दोन कोटी रुपयांची लाच मागितली होती. ही रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याचे ठरले होते. पहिला हप्ता म्हणून रविवारी ४६ लाख ५० हजार रुपये देण्यात येणार होते. मात्र त्याच वेळी एसीबीच्या पथकाने कारवाई करून चिंतामणी यांना रंगेहाथ अटक केली.
हेही वाचा : राज्यात आज वाजणार निवडणुकीचा बिगुल! राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा अपेक्षित
अटकेनंतर सोमवारी प्रमोद चिंतामणीच्या भोसरीमधील घराची झडती घेण्यात आली. या झडतीदरम्यान ५१ लाख रुपयांची रोकड, दागिने आणि मालमत्तेची कागदपत्रे सापडल्याचे ACB ने सांगितले. चिंतामणी हे मूळचे कर्जुले हरियाळ (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथील असल्याचे समजते. रोकडसह दागिन्यांचे आणि मालमत्तेची कागदपत्रे देखील एसीबी जप्त केली आहेत. याप्रकरणी सर्व दृष्टीकोणातून प्रमोद चिंतामणीची चौकशी करण्यात येणार आहे. दोन कोटींपैकी एक कोटी रुपये हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देण्यात येणार होते. अस प्रमोद यांनी एसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे.




