मुस्लिम संघाच्या शाखेत येऊ शकतात का? मोहन भागवतांनी ठेवली ‘ही’ अट, म्हणाले, ‘जे कोणी…’

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकताच वाराणसीचा दौरा केला. यावेळी त्यांनी येथील संघाच्या शाखेला भेट दिली. संघाच्या शाखेत मुस्लिमांना येण्यास मुभा आहे का? असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला. यावर त्याने उत्तर देत संघात सर्वांना येण्यास परवनागी असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता चर्चा रंगली आहे.
भागवत यांनी वाराणसी येथील एका संघाच्या शाखेला भेट दिली. यावेळी त्यांना “शाखेत कोणालाही येण्याची मुभा आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना भागवत म्हणाले की, “जे कोणी ‘भारत माता की जय’ म्हणू शकते, त्याचे संघात स्वागत आहे. जात, धर्म, भाषा, संप्रदाय यावर कोणताही भेदभाव संघ करत नाही.”
ते पुढे म्हणाले, “फक्त जे स्वतःला औरंगजेबाचे वंशज समजतात, त्यांच्यासाठी आमचे दार बंद आहे. बाकी सर्वांचे मनापासून स्वागत आहे.” त्यांच्या वक्तव्याचे आता वेगवेगळे अर्थ लावले जात आहे.
हेही वाचा – सर्वसामान्यांच्या खिशाला फटका! एलपीजी सिलेंडरचे दर वाढले, आता मोजावे लागतील ‘इतके’ पैसे
यावेळी एका स्वयंसेवकाने विचारले होते की, “आपल्या मुस्लिम शेजाऱ्यांनाही शाखेत घेऊन यायला हरकत आहे का?” यावर भागवत म्हणाले, ” मुस्लिम सुद्धा आमचेच आहेत असे आम्ही मानतो. सर्वांना एकत्र करून राष्ट्रनिर्मिती करावी, त्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करावेत असं आमचं मत आहे. जो कोणी ‘भारत माता की जय’ म्हणतो आणि भगव्या ध्वजाचा सन्मान करतो, त्याला कोणतीही मर्यादा नाही. पूजा पद्धतीपेक्षा संस्कृती अधिक महत्त्वाची आहे. आमच्या संस्कृतीचा आधार एक आहे, मग तो कोणत्याही धर्मातील असो.”
संघाच्या शाखांमध्ये कुणाही व्यक्तीला त्याच्या जाती, धर्मावरून प्रवेश नाकारण्यात आलेला नाही, असे भागवत यांनी स्पष्ट केले. संघामध्ये नेहमीच सर्वांचे स्वागत झाले आहे, असेही ते म्हणाले.
शाखेतील कार्यक्रमादरम्यान भागवत यांनी अखंड भारताच्या कल्पनेवरही भाष्य केले. ते म्हणाले, “अनेकांना वाटते की अखंड भारत हा एक काल्पनिक विचार आहे, पण ते शक्य आहे. सिंध प्रदेशाचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, “भारतापासून वेगळे झालेल्या भागांमध्ये आज भेदभाव होत आहे.”