भारत गौरव ट्रेन ९ जूनपासून.! शंभूराज देसाई यांची माहिती

कोयनानगर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून भारत सरकारच्या आयआरसीटीसी व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने ‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन- छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या विशेष पर्यटक ट्रेनचा शुभारंभ दि. ९ जून रोजी मुंबईहून होणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
ही यात्रा पाच दिवसांची असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी निगडित रायगड, लाल महाल, शिवनेरी, प्रतापगड, पन्हाळा यांसारख्या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यात येणार आहे. पुण्यातील शिवसृष्टी प्रकल्प, भीमाशंकर ज्योतिर्लिंग आणि कोल्हापूरची महालक्ष्मी यात्राही या टूरमध्ये समाविष्ट आहे.
पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजोमय इतिहासाचा अनुभव देशातील आणि राज्यातील पर्यटकांना भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून घेता येणार आहे. महाराष्ट्राच्या संस्कृती, शौर्य आणि परंपरेचा हा जागर आहे. पर्यटनाच्या माध्यमातून इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.’’
हेही वाचा – पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या ‘या’ देशांसोबत भारतीय व्यापाऱ्यांनी बंद केला व्यवसाय
या टूरमध्ये आयआरसीटीसीतर्फे एसएल, 3 एसी, व 2 एसी अशा सुविधा उपलब्ध असून सर्व प्रवास, निवास, शाकाहारी भोजन, स्थानिक वाहतूक, गाईड सेवा व प्रवेश शुल्क यांचा समावेश करण्यात आला आहे.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून या ट्रेनची सुरुवात होणार असून दादर व ठाणे येथूनही पर्यटकांना सहभागी होण्याची सुविधा देण्यात येणार आहे. आयआरसीटीसीच्या www.irctctourism.com या संकेतस्थळावर या सहलीबाबत अधिक माहिती व आरक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.