TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

“अशोक खरात प्रकरण अत्यंत घृणास्पद; अशा भोंदूंची जागा तुरुंगातच” : देवेंद्र फडणवीस

भोंदूगिरीच्या आडून लैंगिक व आर्थिक शोषण उघड; SIT तपासात धक्कादायक माहिती समोर

मुंबई : महाराष्ट्रात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक भूमिका घेतली आहे. हे प्रकरण अत्यंत गलिच्छ आणि गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्ट करत, अशा भोंदू बाबांची जागा फक्त तुरुंगातच असल्याचे ठामपणे सांगितले.

फडणवीस म्हणाले की, “श्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक आणि ब्लॅकमेलिंग कसे केले जाते, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. श्रद्धा चांगली असते, पण ती जेव्हा नुकसान करू लागते तेव्हा ती अंधश्रद्धा बनते. अशा भोंदूंच्या जाळ्यात लोक अडकतात.” त्यांनी पुढे सांगितले की, या प्रकरणाचा तपास अत्यंत व्यावसायिक पद्धतीने सुरू असून दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही.

तक्रारी समोर आल्यानंतर सोलापूर आणि नगर येथील घटनांच्या आधारे विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले. त्यानंतर नाशिकमधून अशोक खरातला अटक करण्यात आली. या संपूर्ण तपासावर सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : ‘पॉश ॲक्ट’ अंतर्गत समिती स्थापन न केल्यास कायदेशीर कारवाई’; महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

दरम्यान, ६७ वर्षीय अशोक खरात हा मूळ सिन्नरचा असून, नाशिकमध्ये त्याने आपले जाळे निर्माण केले होते. स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेत तो लोकांचा विश्वास संपादन करत असे. त्याने परदेशात प्रवास केल्याचा दावा करत विविध भाषा आणि परंपरांचे ज्ञान असल्याचे सांगितले होते.

तपासादरम्यान पोलिसांनी त्याचे ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केले आहेत. यामध्ये काही नामांकित व्यक्तींचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओंमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.

खरातने केवळ लैंगिक शोषणच नव्हे, तर आर्थिक फसवणूकही केल्याचे उघड झाले आहे. ‘ऊर्जित दगड’ आणि विविध धार्मिक विधींच्या नावाखाली त्याने लोकांकडून लाखो रुपये उकळले. काहींना परदेशात विधी करण्यास भाग पाडून त्यातूनही मोठी रक्कम कमावली.

याशिवाय, पोलिस तपासात त्याच्या नावावर सुमारे ४० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळली आहे. नाशिक, पुणे, पनवेल आणि सिन्नर येथे त्याचे बंगले, जमिनी आणि व्यावसायिक मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. सध्या पोलिस त्याच्या आर्थिक व्यवहारांचा आणि डिजिटल पुराव्यांचा सखोल तपास करत आहेत.

एकूणच, या प्रकरणामुळे अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यभर चर्चा रंगली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button