रवींद्र जडेजाचा ऐतिहासिक पराक्रम! आयसीसी क्रमवारीत केला नंबर १ चा विश्वविक्रम!

Ravindra Jadeja : रोहित शर्मानंतर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे भारताच्या कसोटी क्रिकेटमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली. अशात चाहत्यांना रवींद्र जडेजाही कसोटी निवृत्ती घेऊन सर्वांना धक्का देईल, असं वाटतं होतं. मात्र, जडेजाने एक मोठा सुखद धक्का दिला आहे. रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये मोठा इतिहास रचला आहे.
आयसीसीने कसोटी अष्टपैलू खेळाडूंची नवीन यादी जाहीर केली आहे. तो आधीच या यादीत अव्वल क्रमांकावर होता. त्यानंतर, आता त्याने जास्तीत जास्त दिवस शीर्षस्थानी राहण्याचा विश्वविक्रम केला आहे. जडेजा ११५२ दिवसांपासून आयसीसीच्या कसोटी अष्टपैलू क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. रवींद्र जडेजा ४०० रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.
हेही वाचा – भारत गौरव ट्रेन ९ जूनपासून.! शंभूराज देसाई यांची माहिती
९ मार्च २०२२ रोजी रवींद्र जडेजा वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला मागे टाकून जगातील नंबर वन टेस्ट अष्टपैलू खेळाडू बनला. तेव्हापासून ३८ महिने झाले आहेत. या काळात, जडेजा नंबर-१ वर कायम आहे. तो सलग ११५२ दिवसांपासून पहिल्या क्रमांकावर आहे. २०२२ मध्ये जेव्हा रवींद्र जडेजा जगातील नंबर वन टेस्ट अष्टपैलू खेळाडू बनला तेव्हा तो दुसऱ्यांदा पहिल्या क्रमांकावर पोहोचला. यापूर्वी, तो २०१७ मध्ये एका आठवड्यासाठी पहिल्या क्रमांकावर राहिला होता.
जडेजा दुसऱ्यांदा अव्वल क्रमांकावर पोहोचल्यापासून, आतापर्यंत कोणीही त्याला मागे टाकू शकलेले नाही. ताज्या कसोटी अष्टपैलू क्रमवारीत अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी रवींद्र जडेजा मेहदी हसन मिराजशी स्पर्धा करत होता. ज्याचे ३२७ रेटिंग गुण आहेत. ताज्या क्रमवारीत, मेहदी हसनने मार्को जान्सेनला मागे टाकत दुसरे स्थान मिळवले आहे. दरम्यान, जान्सेन २९४ रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. या यादीत पॅट कमिन्स चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचे २७१ रेटिंग पॉइंट्स आहेत.