Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेराजकारणलोकसंवाद - संपादकीय

To The Point: माजी नगरसेविका सीमा सावळे यांचा आणखी एक नैतिक पराभव!

‘‘होणारच नाही...’’ असा दावा केलेल्या माता रमाई स्मारकाचे दिमाखात भूमिपूजन

पिंपरी-चिंचवड । अविनाश आदक । पिंपरी-चिंचवडमधील मध्यवर्ती चौक अर्थात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आणि भीमसृष्टी शेजारीच त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यासाठी लढा उभारला. अखेर त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आणि आज ‘‘त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारकाचे’’ भूमिपूजन दिमाखात होत आहे. (सीमा सावळे)

पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकीय राजवट असताना वर्षभरापूर्वी शहराचा सुधारित प्रारुप विकास आराखडा जाहीर करण्यात आला. त्यावर हरकती आणि सूचना घेण्यात आल्या. ‘‘या आराखड्यामध्ये माता रमाई स्मारकाचे आरक्षण रद्द केले. त्यामुळे स्मारक उभारता येणार नाही..’’ असा कांगावा करीत माजी नगरसेविका सीमा सावळे यांनी फेसबूक लाईव्ह केले होते. तसेच, चळवळीत कार्यकर्त्यांची दिशाभूल करुन मूकमोर्चासुद्धा काढला होता. प्रशासकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी राज्यातील सत्ताधारी महायुतीला लक्ष्य केले होते.

वास्तविक, महापालिका प्रशासन आणि नगरविकास विभागाने सदर आरक्षणाचा उल्लेख ‘‘म्युनसिपल पर्पज’’ असा करुन स्मारकाच्या उभारणीतील तांत्रिक अडथळा दूर केला होता. आज मोठ्या दिमाखात स्मारकाची पायाभरणी सुरू झाली. हा सीमा सावळे यांचा नैतिक पराभव म्हणावा लागेल. ‘‘मी भीमाची वाघीण… तर कधी मी शिवसेनेची वाघीण… आता मी राष्ट्रवादीची वाघीण…’’ अशी वारंवार सोईनुसार भूमिका बदलणाऱ्या सावळे यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी ही बाब आहे.

सीमा सावळे यांचा पहिला नैतिक पराभव…

राष्ट्रवादी काँग्रेसला प्रखर विरोध करीत शिवसेनेतून सीमा सावळे यांनी राजकीय कारकीर्दीला सुरवात केली. २०१७ मध्ये राष्ट्रवादीला सत्तेतून पायउतार करण्यासाठी रान पेटवले आणि ‘फेक नॅरेटिव्ह’चा धडाका लावला. त्यावेळी राष्ट्रवादीला मोठी किंमत चुकवावी लागली. पक्ष विरोधी कृती केल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी केली होती. त्यानंतर सावळे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. ज्या शिवसेना पक्षाने सावळेंना पहिली संधी दिली. त्या पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या सावळे यांचा हा पाहिला नैतिक पराभव होता.

दुसरा नैतिक पराभव…

शिवसेनेत असताना भाजपाशी सलगी करुन २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सत्तेतून पायउतार करण्यासाठी रणनिती आखण्यामध्ये सीमा सावळे आणि त्यांचे राजकीय सल्लागार सारंग कामतेकर यांचा मोठा वाटा होता. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी सावळे यांना सत्तेच्या पहिल्या वर्षातच स्थायी समिती सभापतीपदी काम करण्याची संधी दिली. मात्र, प्रचंड राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या सावळे यांनी २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा क्षेत्र निवडले. त्याठिकाणी भाजपाविरोधात त्यांनी उमेदवारी लढवली. भाजपाविरोधात बंडखोरी करणे आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत होणे, त्यावर भाजपातून हकालपट्टी होणे… हा सावळे यांचा दुससा नैतिक पराभव मानला जातो.

तिसरा नैतिक पराभव…

दिवंगत अजित पवार यांना पिंपरी-चिंचवड शहरात पाऊल ठेवू देणार नाही. भ्रष्टाचाराचा भस्मासूर खणून काढणार असा दावा करीत ‘‘अंकूश’’ सारखे पुस्तक लिहीणाऱ्या सीमा सावळे २०१९ नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आल्या. २०२२ मध्ये महापालिका निवडणूक होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रशासकीय राजवट लागली. २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यावेळी भाजपाच्या नगरसेविका असतानाही सावळे यांनी महाविकास आघाडीशी अप्रत्यक्ष हातमिळवणी केली. मात्र, निवडणूक झाली नाही. प्रशासकीय राजवट सुरू झाली. त्यानंतरच्या काळात सीमा सावळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राजकीय सूर जळवून घेतले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी विधानसभेतून विद्यमान आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांचा पत्ता कट करण्याची रणनिती आखली. मात्र, अजित पवार यांनी त्यावेळी बनसोडे यांनाच तिकीट दिले. सावळे यांचा हा तिसरा नैतिक पराभव होता.

चौथा नैतिक पराभव…

२०२६ मध्ये महापालिका निवडणूक जाहीर झाली. त्यापूर्वीच अपेक्षेप्रमाणे सीमा सावळे यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीवर तुफान आरोप करीत त्यांनी इंद्रायणीनगर प्रभागातून निवडणूक लढवली. त्या ठिकाणी भाजपाने प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. सुहास कांबळे यांना उमेदवारी दिली. सुमारे २५ वर्षे सक्रीय राजकारणात असलेल्या सीमा सावळे यांना चुरशीच्या लढतीत पराभव पत्कारावा लागला. हा सावळे यांचा चौथा नैतिक पराभव होता. त्यानंतर स्वीकृत नगरसेवकपदासाठी सावळे यांनी राष्ट्रवादीचे नेते खासदार पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे ‘फिल्डिंग’ लावली. याच सावळे यांनी २०१९ मध्ये मावळ लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांच्या विरोधात काम केले होते, असे राजकीय जाणकार सांगतात.

पाचवा नैतिक पराभव…

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून पिंपरी विधानसभा मतदार संघातून तिकीट मिळावे. यासाठी सीमा सावळे यांनी अक्षरश: आकाश-पातळ एक केले. आण्णा बनसोडे यांच्याविरोधात शहराध्यक्ष तथा माजी महापौर योगेश बहल यांना हाताशी धरुन रान पेटवले. त्यांना तिकीट मिळाले नाही. बनसोडे या चुरशीच्या लढाईत विजयी झाले. ‘‘आमदार होण्याच्या लायक आहेत का?’’ असा नॅरेटिव्ह करणाऱ्या सावळे यांना न जुमानता दिवंगत अजित पवार यांनी आपले निष्ठावंत आण्णा बनसोडे यांना विधानसभा उपाध्यक्षपदावर संधी दिली. बनसोडे यांच्याऐवजी सावळे यांना तिकीट मिळाले असते, तर बनसोडे यांनी बंडखोरी केली असती आणि राष्ट्रवादी शहरातून हद्दपार झाली असती, असेही राजकीय जाणकारांचे निरीक्षण आहे.

आता विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागेवर योगेश बहल यांना संधी मिळावी म्हणून सीमा सावळे यांनी शिष्टमंडळ तयार केले. ते शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांना भेटले. बहलांना संधी मिळावी आणि पिंपरी विधानसभेवरील आपला ‘क्लेम’ निश्चित व्हावा. याकरीता सावळे यांनी ही रणनिती आखली आहे. मात्र, यामध्ये बनसोडे आणि राष्ट्रादीचाच ‘करेक्ट कार्यक्रम’ होणार आहे. ज्या मंगला कदम आणि योगेश बहल यांच्याविरोधात ‘शिवसेनेची वाघीण’ म्हणून सीमा सावळे यांनी शहरात ओळख निर्माण केली. त्या सावळे यांना बहलांसाठी विधान परिषद मागावी लागते, हा सावळेंचा पाचवा नैतिक पराभव म्हणावा लागेल.

सहावा नैतिक पराभव…

‘‘माजी महापौर योगेश बहल यांना विधान परिषदेवर संधी द्यावी…’’ अशी मागणी करीत राष्ट्रवादीत असलेला स्थानिक आणि बाहेरचा हा वादाला सीमा सावळे यांनी पुन्हा एकदा ‘फुंकर’ घातली आहे. माजी आमदार विलास लांडे आणि माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांना संधी मिळावी, अशी येथील स्थानिक भूमिपुत्रांची अपेक्षा आहे. मात्र, सीमा सावळे यांनी योगेश बहल यांच्यासोबत नगरसेवकांचा गट तयार केला. त्यांना सोबत घेवून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांची मुंबईत भेट घेतली. या बैठकीला विलास लांडे, अजित गव्हाणे, नाना काटे आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर उपस्थित नव्हते. त्यामुळे आठ दिवसांपूर्वी ‘‘महाईन्यूज’’ ने To The Point या सदरामध्ये ‘‘राष्ट्रवादी स्थानिकांचा विश्वास कमावणार की गमावणार? असे विश्लेषण दिले होते. त्यानंतर मुंबईमध्ये शिष्टमंडळाची झालेली भेट ही विशिष्ट राजकीय संकेत देणारी आहे. दिवंगत खासदार गजानन बाबर, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यापासून एकाही स्थानिक नेत्याचा विश्वास सीमा सावळे यांना आपल्या राजकीय कारकीर्दीत जपता आला नाही, यापुढील काळात तशी सूतराम शक्यता नाही, हा सावळे यांचा सहावा नैतिक पराभव आहे.

सातवा नैतिक पराभव…

आंबेडकरी विचारांच्या चळवळीतील आक्रमक नेत्या म्हणून सीमा सावळे यांची एकेकाळी ओळख होती. पिंपरीतील माता रमाई स्मारकाच्या आरक्षणावरुन त्यांनी वादाची ठिणगी पेटवण्याचा प्रयत्न केला. त्याला यश मिळाले नाही. किंबहुना, ‘‘स्मारक होणार नाही… आरक्षण रद्द केले…’’ असा दावा त्यांनी जाहीरपणे केला होता. त्याद्वारे चळवळीत कार्यकर्त्यांची दिशाभूल करणे आणि त्याचे राजकीय मायलेज कमावण्यासाठी कसरत केली. पण, महापौर रवी लांडगे यांनी भूमिपूजनाची घोषणा केली. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी १९ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे यांनी या विषयाला ताकद दिली. नगरसेवक डॉ. सुहास कांबळे, नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांनी हा मुद्दा लावून धरला आणि आज तो सोन्याचा दिवस उगवला… त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन संपन्न होत आहे. हा आंबेडकरी चळवळीत तमाम कार्यकर्त्यांचा मोठा विजय आहे आणि सीमा सावळे यांचा सामाजिक व राजकीयदृष्‍टया सातवा नैतिक पराभव आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची उभारणी इथल्या भूमिपुत्रांच्या समर्पणावर झालेली आहे. या शहराच्या लौकीकासाठी स्थानिक नेत्यांनी योगदान दिले आहे. आगामी काळात स्थानिकांना सोबत घेतल्याशिवाय राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त होणार नाही, ही बाब खासदार पार्थ पवार यांनी लक्षात घेतली पाहिजे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button