‘फडणवीसांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती’; एकनाथ खडसेंचा मोठा दावा

मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती, असा मोठा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसेच, फडणवीसांनी मला सांगितलं होतं की मी मनापासून प्रयत्न करेन. याशिवाय त्यांनी त्यांच्या मुलीची शपथ घेऊन मला राज्यपालपदाबाबत आश्वासन दिलं होतं, असंही एकनाथ खडसे म्हणाले. एकनाथ खडसे यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले?
एके दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलावलं, मी त्यांच्याकडे गेलो. तुम्ही प्रसारमाध्यमं म्हणत आहात ज्याप्रमाणे पंकजा मुंडेंना त्यांनी न्याय दिला, त्याप्रमाणे मला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, असं ते मला म्हणाले. फडणवीस मला म्हणाले, मी आता तुम्हाला राज्यपाल करणार आहे. तशी मी वरिष्ठांकडे शिफारस करणार आहे. त्यावर मी त्यांना स्पष्ट म्हणालो, देवेंद्रजी तुम्ही बऱ्याचदा अशी आश्वासनं देता, हे करेन, ते करेन, परंतु तुम्ही ती आश्वासनं पूर्ण करत नाही. त्यामुळे मला खरं सांगा, कारण माझा विश्वास बसत नाही. त्यावर ते मला म्हणाले, आम्ही तुम्हाला राज्यपाल करणार आहोत.
हेही वाचा – मोदी सरकारच्या धोरणांचा ‘महाराष्ट्र धर्म’ : राज्यात महत्वाच्या योजना, गुंतवणुकीतही वाढ!
मी त्यांना म्हटलं, आनंदाची गोष्ट आहे, मला राज्यपाल केलं तर चांगलंच आहे. परंतु माझा या आश्वासनांवर विश्वास नाही. त्यावर देवेंद्र फडणवीस मला म्हणाले मी माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो आम्ही तुम्हाला राज्यपाल करणार आहोत. हे देवेंद्र फडणवीस यांचे शब्द जसेच्या तसे मी तुम्हाला जाहीरपणे सांगत आहे.
भाजपात का घेतलं गेलं नाही? असा प्रश्न विचारला असता. ते म्हणाले, या प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकत नाही. पक्षप्रवेश का झाला नाही, राज्यपाल का केलं नाही हे मला माहिती नाही. त्यांनी जे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगत आहे. फडणवीस यांनी माझ्या राज्यपालपदाची शिफारस केली होती, असं त्यांनीच मला सांगितलं होतं, असंही एकनाथ खडसे म्हणाले.





