तटकरेंच्या घरी मेजवानी अमित शाहांनी दिला संकेत? रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार?

Raigad Guardian Minister : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा महायुतीतील तिढा अद्यापही सुटलेला नाही. यातच शनिवारी 12 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. यानंतर अमित शाह हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील गीताबाग येथील निवासस्थानी जेवणासाठी देखील गेले. याद्वारे सुनील तटकरे यांच्या घरी भेट देत अमित शाह यांनी अनेक राजकीय संकेत दिले आहेत.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून एकनाथ शिंदेंच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात सुरू असलेल्या राजकीय वादाला आणखी उधाण आले आहे. शिवसेनेच्या आक्षेपानंतर सुनील तटकरे यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकरे यांची रायगडचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी या पदावर दावा केला आहे.
हेही वाचा – सोनिया अन् राहुल गांधी अडचणीत, या प्रकरणात ईडीकडून मालमत्ता जप्तीची प्रक्रिया
या भेटीनंतर सुनील तटकरे म्हणाले की, “अमित शाह यांची ही भेट कौटुंबिक होती, राजकीय नव्हती. या भेटीत अमित शाह यांच्याबरोबर मनमोकळेपणाने चर्चा झाली. तसेच भरत गोगावले आणि उदय सामंत, महेंद्र दळवी यांना आम्ही स्नेहभोजनासाठी आमंत्रित केलं होतं. पण ते का आले नाहीत हे मला माहिती नाही. माझं कर्तव्य होतं ते मी केले आहे.”
दरम्यान, अमित शहा यांची तटकरेंच्या घरी भेट ही भाजपचा राष्ट्रवादीला पाठिंबा म्हणून पाहिली जात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पालकमंत्र्यांच्या वादाचा परिणाम महायुतीच्या आघाडीवर होऊ शकतो. नाशिकमध्ये शिवसेनेचे दादासाहेब भुसे आणि भाजपचे गिरीश महाजन यांच्यात असाच वाद सुरू आहे. शिंदे यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारीमध्ये दोन्ही नियुक्त्यांना स्थगिती दिली होती.