माऊलींचा 750 वा जन्मोत्सव भव्य होणार, मुख्यमंत्र्यांसोबत आळंदी संस्थानाची चर्चा

आळंदी : येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 750 वा जन्मोत्सव भव्य स्वरूपात साजरा करणार आहे. या सोहळ्याच्या तयारीसाठी संस्थानच्या विश्वस्तांनी नुकतीच मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
भेटीदरम्यान प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त राजेंद्र उमाप आणि भावार्थ देखणे उपस्थित होते. संस्थानातर्फे मुख्यमंत्र्यांचा शाल आणि माऊलींची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. विश्वस्तांनी उत्सवाच्या नियोजनाची माहिती देत प्रशासनाकडून आवश्यक सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. हा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव 3 मे ते 10 मे 2025 या कालावधीत आळंदीत होणार असून, देशभरातील भाविक आणि वारकरी यात सहभागी होतील.
हेही वाचा – तटकरेंच्या घरी मेजवानी अमित शाहांनी दिला संकेत? रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. आळंदीत धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन होणार असून भाविकांसाठी सुविधा आणि सुरक्षेची विशेष व्यवस्था केली जाईल. हा ऐतिहासिक सोहळा सर्वांनी अनुभवावा, असे आवाहन संस्थान कमिटीने केले आहे.