‘कर्जमाफीबाबत अजित पवारांची भूमिका ही सरकारची’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरपूर : राज्यातील कर्जमाफीबाबत अजित पवारांनी माडंलेली भूमिका हीच राज्य सरकारची असल्याचे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे बोलताना व्यक्त केले. दरम्यान, काशी, उज्जैनच्या धर्तीवरच पंढरपुराचा विकास होणार असून, पुढील तीन महिन्यांत ‘पंढरपूर कॉरिडॉर’साठी आवश्यक भूसंपादन करण्यात येणार आहे. यामध्ये जे बाधित होतील त्यांना आतापर्यंतचा सर्वाधिक मोबदला दिला जाईल, असेही फडणवीस यांनी या वेळी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर येथे देवदर्शनासाठी आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने यापुढे कर्जमाफी देता येणार नसल्याबाबतचे मतप्रदर्शन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल व्यक्त केले होते. त्यावरून राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. याच प्रश्नावर फडणवीस यांनी वरील भूमिका मांडत ही राज्य सरकारचीच भूमिका असल्याचे या वेळी जाहीर केले.
दरम्यान, फडणवीस यांनी आज पंढरपूर विकासकामाचाही आढावा घेतला. या वेळी पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, मंदिर समितीचे मनोज श्रोत्री आदी उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर कॉरिडॉरसंदर्भात माहिती दिली.
हेही वाचा – “महायुतीने चांगलं काम केल्याने आम्ही विजयाची गुढी उभारु शकलो”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विधान
याचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले, की या विकास आराखड्यासाठी पुढील तीन महिन्यांत भूसंपादन केले जाईल. तेथील नागरिकांना जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधी माहिती देतील. यामध्ये जे दुकानदार, घरमालक बाधित होतील त्यांना आतापर्यंतचा सर्वाधिक मोबदला दिला जाईल. हे तीर्थक्षेत्र आहे. इथे विविध वारी, यात्रांसाठी लाखो भाविक राज्य-परराज्यांतून येत असतात. असा वेळी विकासकामांसाठी काही उपाययोजना तातडीने करणे गरजेचे आहे, असेही फडणवीस यांनी या वेळी सांगितले.
या वेळी फडणवीस यांनी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. मंदिरातील जतन आणि संवर्धनाचे काम पाहिले. याबाबत पुरातत्त्व विभागाला काही सूचनाही केल्या. आषाढी यात्रेपूर्वी काही कामे, तर आषाढीनंतर उर्वरित कामे पूर्ण होतील, अशी माहिती मुख्यमंत्री यांनी दिली.
दरम्यान, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वडिलांच्या निधनानिमित्त फडणवीस यांनी त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले. या वेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, डॉ. बाबासाहेब देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राम सातपुते आदी उपस्थित होते.