Ahmedabad Plane Crash : टाटा समूहाकडून मृतांच्या कुटुंबियांना 1 कोटींची मदत जाहीर, आतापर्यंत केवळ 1 प्रवासी आढळला जिवंत

अहमदाबाद : अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट AI171 (बोइंग 787-8 ड्रीमलाइनर) चा गुरुवारी (१२ जून) दुपारी १:३८ वाजता उड्डाणानंतर अवघ्या पाच मिनिटांत मेघानी नगर परिसरात झालेल्या भीषण अपघातात २४२ प्रवाशांपैकी 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर टाटा समूहाने मोठी घोषणा केली आहे. टाटा संसचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी प्रत्येक मृताच्या कुटुंबाला १ कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
चंद्रशेखरन यांनी सांगितले की, “आम्ही जखमींच्या वैद्यकीय खर्चाचा संपूर्ण भार उचलू आणि त्यांना सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा व सहाय्य पुरवू. तसेच, बी.जे. मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी वसतिगृहाच्या पुनर्बांधणीसाठीही आर्थिक मदत देऊ.” विमान या वसतिगृहावर कोसळल्याने २० विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
एअर इंडिया ही भारताची राष्ट्रीय विमान कंपनी आहे, जी सध्या टाटा समूहाच्या मालकीखाली आहे. 1932 मध्ये जे.आर.डी. टाटा यांनी टाटा एअरलाइन्स म्हणून तिची स्थापना केली. 1953 मध्ये भारत सरकारने ती राष्ट्रीयीकृत केली. ऑक्टोबर 2021 मध्ये, टाटा समूहाने 18,000 कोटी रुपयांना एअर इंडियाला पुन्हा विकत घेतले, ज्यामुळे ती खासगी मालकीची बनली. टाटा समूहाने कंपनीच्या आधुनिकीकरणासाठी आणि सेवा सुधारणेसाठी मोठी गुंतवणूक केली आहे. सध्या एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन असून, ती आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत मार्गांवर सेवा पुरवते.
हेही वाचा – कोकणात अतिवृष्टीचा तर इतर भागात मुसळधार पावसाचा इशारा
विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते, यापैकी १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनडियन नागरिक होते. अपघातानंतर विमानाला आग लागली आणि परिसरात घनघोर धूर पसरला. एनडीआरएफच्या ९० कर्मचाऱ्यांच्या सहा तुकड्या, बीएसएफ आणि दमकल विभाग बचावकार्यासाठी कार्यरत आहे. जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला. अहमदाबाद पोलिसांनी हेल्पलाइन क्रमांक ०७९२५६२०३५९, तर एअर इंडियाने १८००५६९१४४४ आणि नागरिक उड्डयन मंत्रालयाने ०११-२४६१०८४३, ९६५०३९१८५९ हे क्रमांक जाहीर केले आहेत.
अहमदाबादचे पोलिस आयुक्त जीएस मलिक यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, पोलिसांना सीट ११अ वर एक व्यक्ती जिवंत आढळली. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांच्या संख्येबद्दल अद्याप काहीही सांगता येत नाही. विमान निवासी भागात कोसळल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो.